उपनिषदांत ज्ञानाचे मुख्यतः दोन प्रकार सांगितले आहेत - अपरा व परा. अपरा विद्या म्हणजे आपल्या सभोवतालच्या वस्तू व कल्पना यांसंबंधीचे ज्ञान. हे भौतिक, लौकिक ज्ञान होय. परा विद्या म्हणजे अध्यात्म किंवा आत्मज्ञान होय. भारतीय दर्शनांत ज्ञान उत्पन्न करणाऱ्या साधनांना प्रमाण असे नाव आहे. चार्वाकदर्शनात प्रत्यक्ष म्हणजे इंद्रियांना येणारा अनुभव हे एकच प्रमाण मानलेले आहे. बौद्ध व वैशेषिक दर्शनांत प्रत्यक्ष व अनुमान ही दोन प्रमाणे मानतात. न्यायदर्शनात प्रत्यक्ष, अनुमान, उपमान व शब्द ही चार प्रमाणे मानली आहेत. मीमांसा व वेदान्त या दर्शनांमध्ये प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती व अनुपलब्धी ही सहा प्रमाणे मानली आहेत; पण श्रीशंकराचार्यांनी प्रत्यक्ष, अनुमान व शब्द या तीन प्रमाणांना महत्त्व दिले आहे. इंद्रियांच्या आणि बुद्धीच्या संयोगाने साधलेल्या ज्ञानाला ‘प्रत्यक्ष प्रमाण’ म्हणतात. तर्काचा उपयोग करून मिळवलेल्या ज्ञानाला ‘अनुमान प्रमाण’ म्हणतात. जे ज्ञान आपल्या इंद्रियांच्या, बुद्धीच्या आणि तर्काच्या कक्षेत सामावत नाही ते अध्यात्म ज्ञान (आत्मज्ञान) संतांनी ग्रंथांच्या माध्यमातून आपल्या पुढे आणले त्याला ‘शब्द प्रमाण’ म्हणतात. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानाची व्याख्या देताना माउली म्हणतात-
अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान ।
तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥ ज्ञा. अ. ७/ओवी क्र. ६ ॥
ते म्हणतात स्वतःच्या स्वरूपाची जाणीव हेच खरे ज्ञान आहे. लौकिक जगाचे ज्ञान हे विज्ञान आहे आणि त्यालाच खरे ज्ञान म्हणणे हे सर्वांत मोठे अज्ञान आहे.
गुरुदेव रानडे स्व-स्वरूपाची जाणीव साधताना चार प्रांत सांगतात- इंद्रियांचा प्रांत, मनाचा प्रांत, बुद्धीचा प्रांत व दिव्यशक्तीचा प्रांत. मी म्हणजे ‘इंद्रिये’ म्हटलं तर समाधान नाही; कारण इंद्रिये सैरावैरा धावतात. मी म्हणजे ‘मन’ म्हटलं तर समाधान नाही; कारण मन चंचल आहे. ते संकल्प- विकल्पांचं जाळं विणतं, त्यात स्वतः अडकतं आणि इतरांनाही अडकवतं. मी म्हणजे ‘बुद्धी’ म्हटलं तर समाधान नाही; कारण बुद्धीला अहंकार बाधक आहे. मग समाधान केव्हा आहे? तर मी म्हणजे दिव्यशक्ती आहे ही जाणीव, हे ज्ञान जेव्हा प्रगट होते तेव्हा समाधान आहे. हे ज्ञान साध्य करण्यासाठी योग्यांना अनेक वर्षे तप करावे लागते; मात्र पंढरीच्या वाटेवर सर्वसामान्य वारकरी मात्र सहज या ज्ञानाचा अधिकारी होतो आणि स्वतःला; तसेच सर्व जगाला माउली स्वरूपात पाहतो.
इंद्रियजन्य ज्ञानापासून सुरुवात करून, बुद्धीच्या साह्याने, कर्माच्या आचरणाने आणि शेवटी अनुभवाने आत्मज्ञानापर्यंत जाणे हाच भारतीय तत्त्वज्ञानाचा राजमार्ग आहे; कारण ज्ञानाशिवाय बंधातून सुटका नाही आणि मोक्षप्राप्ती नाही. संतांनी वारीच्या माध्यमातून आपल्यासाठी सहज हा राजमार्ग मोकळा केला.
तुकाराम महाराज म्हणतात-
पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ।।
(समाप्त)







