Attack On Students Protest March Against Corruption In Education System And Paper Leak
विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधात मोर्चा
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
देशभरात वारंवार घडणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटना, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या निषेधार्थ जागरूक नागरिक मंच तुमसरच्यावतीने शहरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी गणेश दिघे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
हा मोर्चा तुमसरातील मातोश्री लॉन येथून निघून तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.प्रशासनाला दिलेल्या निवेदनात आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांवर होणारा पोलिसांचा हिंसाचार सरकारपुरस्कृत असल्याचा आरोप केला. अशा घटनांमध्ये राजकीय गुंडांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत हे कृत्य भारतीय लोकशाही , राज्यघटना आणि सर्वसामान्यांचे मूलभूत अधिकार चिरडणारे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या प्रकारांमुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.