Big Bash Test In India Cricket Australia Considering The Proposal
‘बिग बॅश’ कसोटी भारतात?
Contributed by: मेलबर्न|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘बिग बॅश’ या ऑस्ट्रेलियातील टी-२० लीगची सलामीची लढत भारतात घेण्याचा निर्णय घेतल्यावर ‘ क्रिकेट ऑस्ट्रेलिया ’ पुढचे पाऊल उचलण्याचा विचार करीत आहे. इंग्लंडविरुद्धच्या ॲशेस मालिकेतील एक कसोटी भारतात घेण्याचा ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चा विचार आहे. भारतातील क्रिकेट मार्केट लक्षात घेऊनच त्याबाबतचा प्रस्ताव तयार होत असल्याचे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चे प्रमुख कार्यकारी संचालक टोड ग्रीनबर्ग यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका १८८२पासून घेतली जात आहे. सध्या दर चार वर्षांत ही मालिका होत आहे. २०२५-२६मधील मालिका ऑस्ट्रेलियाने ४-१ अशी जिंकली होती. आगामी मालिका २०२७मध्ये इंग्लंडला होईल. प्रतिस्पर्धी संघांत पुढील वर्षी मार्चमध्ये विद्युतझोतातील कसोटी होणार आहे. ही कसोटी मेलबर्नला होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यातील पहिल्या कसोटीस दीडशे वर्ष पूर्ण होत असल्यामुळे ही कसोटी होणार आहे. ऑस्ट्रेलिया-इंग्लंडची महोत्सवी कसोटी भारतात होऊ शकेल का, अशी विचारणा ग्रीनबर्ग यांना करण्यात आली. त्या वेळी त्यांनी सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले. ‘ बिग बॅश लीग ’ची सलामीची लढत यंदा डिसेंबरमध्ये चेन्नईत आहे. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड; तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह चांगले संबंध आहेत. भारतातील क्रिकेटच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याच्या अनेक संधी आहेत. त्याचा आम्ही नक्कीच विचार करू शकतो. अर्थात, सध्या तरी त्याबाबतची कोणतीही योजना नाही,’ असे ग्रीनबर्ग यांनी सांगितले.