ज्ञानगंगा नदीत बुडून एकाचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
death by drowning in gyan ganga river inquiry underway
बुलढाणा : पिंपळगाव राजा येथील ज्ञानगंगा नदीपात्रात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. गुरुवारी ही घटना उघडकीस आली. शेख सोहिल शेख रशीद (वय ४३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील रहिवासी होता. त्याचा मुलगा शेख उजेफ याने पोलिसांत फिर्याद दिली. २३ जुलै रोजी दुपारी पिंपळगाव राजा येथील मोठ्या पुलाजवळील ज्ञानगंगा नदीपात्रात शेख सोहिल शेख रशीद यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला. हा अपघात कसा घडला, याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद
बुलढाणा : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जिल्हास्तर व तालुकास्तरावर कार्यरत जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या आठ महिन्यांपासून मानधन रखडले आहे. यामुळे प्रपंच चालविणे अवघड झाले असून, वेतन अदा करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी २३ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मानधनाची रक्कम राज्यस्तरावर उपलब्ध होऊनही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कार्यवाही होत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

पुतण्यास जन्मठेप

भंडारा : जुन्या पैशांच्या वादातून काकाचा धारदार शस्त्राने खून करणाऱ्या पुतण्यास जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संदेश राजेंद्र क्षीरसागर (२४) रा. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. ३० जून २०२२ रोजी अड्याळ पोलिस ठाण्यांतर्गत ईटगाव-लेंडेझरी जंगल शिवारात अनिकेश अजाबराव क्षीरसागर (४९) रा. चिखली ले-आऊट, नागपूर यांचा मृतदेह आढळला होता. आरोपी संदेश हा अनिकेश यांचा पुतण्या आहे. दोघांमध्ये पैशांवरून जुना वाद होता.