नवनिर्वाचित खासदार, आमदारांचा सत्कार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
grand felicitation of newly elected mps and mlas in latur
लातूर : आमदार अभिमन्यू पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यानंतर नवनिर्वाचित राज्यसभा खासदार रामराव वडकुते, विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आमदार बसवराज पाटील व आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा होते. भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी आमदार त्र्यंबक भिसे, दिनकरराव माने, गोविंद केंद्रे, बब्रुवान खंदाडे, सुभाष जाधव, संतोष मुक्ता, शोभाताई पवार, परीक्षित पवार आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी भाजपची ताकद तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे सांगत बूथस्तरावर संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. ‘मन की बात’सारख्या उपक्रमांमुळे समाजाशी सातत्याने संवाद साधता येतो, असे त्यांनी नमूद केले. आमदार पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून रस्ते व पायाभूत सुविधा उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी; तसेच सर्वसमावेशक विकासाबाबतची सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

किल्लारी येथील निळकंठेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रारंभानिमित्त मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाला. या वेळी आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार बसवराज पाटील, आमदार राजेंद्र राऊत, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, सहकार विभागाचे अधिकारी समृत जाधव, मानद सचिव प्रवीण फडणीस आदी मान्यवर उपस्थित होते.