Irregular Bus Services Lead To School Being Held At Malkapur Depot For Students
मलकापूर आगारात भरली विद्यार्थ्यांची शाळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
बुलढाणा : अनियमित बसफेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेता शिवसेना (उबाठा)च्या वतीने टाकळी घडेकर येथील विद्यार्थ्यांची थेट मलकापूर आगार व्यवस्थापकांच्या कक्षात शाळा भरविण्यात आली. या आंदोलनामुळे बसस्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मलकापूर ते पोफळी ही बस टाकळी फाट्यावरून जाते. टाकळी घडेकर येथील विद्यार्थ्यांना बस पकडण्यासाठी दररोज दोन ते अडीच किलोमीटर अंतर पायी चालत टाकळी फाट्यावर यावे लागते. या दरम्यान बस निघून गेल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर होतो. दुपारी तीन वाजताची बस पकडण्यासाठीही विद्यार्थ्यांना दोन तासिका आधीच शाळा सोडून निघावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची तक्रार पालकांनी केली. शिवसेना (उबाठा)चे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले.