ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या अस्तित्वाच्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या कथा आहेत. बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेत सामान्य माणूस कसा भरडला जातो, त्याच्या जगण्याचे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होत जातात आणि विकासाच्या घोषणांमध्ये त्याचा आवाज कसा हरवतो याचे संवेदनशील चित्रण या कथासंग्रहात आहे. ‘महामार्ग’ ही शीर्षक कथा संग्रहाचा गाभा म्हणावी लागेल. विकासाच्या नावाखाली होणारे भूसंपादन, सरकारी यंत्रणा, स्थानिक राजकारण आणि शेतकऱ्यांचे असहाय आयुष्य या कथेत प्रभावीपणे उलगडते. बायजा आणि तिचा मुलगा नाथा ही केवळ पात्रे नाहीत; ते आजच्या हजारो विस्थापित कुटुंबांचे प्रतीक आहेत. जमिनीचा व्यवहार हा केवळ आर्थिक व्यवहार राहत नाही, तर तो अस्तित्वाचा प्रश्न होतो. गावकऱ्यांच्या आंदोलनामुळे महामार्गाची दिशा बदलते; पण तोपर्यंत बायजाचे सर्वस्व गमावलेले असते. या शोकांतिकेतून विकासाच्या संकल्पनेतील विरोधाभास लेखक अत्यंत परिणामकारकपणे अधोरेखित करतो. ‘गंडवणूक’ आणि ‘पाचगत’ या कथा बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि राजकीय आश्वासनांच्या फसव्या वास्तवाचा वेध घेतात. नोकरीच्या आशेने शेती विकणाऱ्या कुटुंबाची वाताहत ही केवळ एका घराची कहाणी राहत नाही; ती आजच्या व्यवस्थेचे भयावह वास्तव बनते. ‘पाचगत’ ही कथा ‘गंडवणूक’चा भावनिक विस्तार ठरते. लेखकाने दोन्ही कथांमध्ये घटनांची मांडणी वास्तववादी ठेवली आहे. त्यामुळे त्यांचा परिणाम तीव्र होतो. ‘पाणी विकायची गोष्ट’ ही कथा बदलत्या ग्रामीण मूल्यव्यवस्थेचा अभ्यास मांडते. गावासाठी पाण्याची व्यवस्था करणाऱ्या पिढीची जागा पाण्यालाही नफ्याच्या दृष्टिकोनातून पाहणाऱ्या नव्या मानसिकतेने घेतल्याचे चित्र यातून उभे राहते. जागतिकीकरणाचा ग्रामीण जीवनावर झालेला सूक्ष्म परिणाम लेखकाने अत्यंत सहजपणे टिपला आहे.
‘कवंडळ’ ही कथा कौटुंबिक नात्यांतील दुरावा, कोरोना महामारीनंतरचे सामाजिक बदल आणि माणसामाणसांतील वाढती भावनिक दरी मांडते, तर ‘पीळ’ ही कथा जात, राजकारण आणि शिक्षण यांच्या गुंतागुंतीच्या नात्यांवर भाष्य करते. समाजातील अदृश्य विषमता खोलवर रुजलेली असल्याचे दाखवते. ‘धडा’, ‘खोड’ आणि ‘ऐनक’ या कथा भाषिक वैशिष्ट्य आणि सूक्ष्म निरीक्षणामुळे वाचनीय ठरतात. प्रत्येक कथा वेगळा सामाजिक संदर्भ उलगडते आणि संग्रहाची आशयसमृद्धी वाढवते. ग्रामीण बोलीतील दुर्मीळ, लुप्तप्राय शब्द लेखकाने सहजतेने कथांमध्ये वापरले आहेत. त्यामुळे कथा वाचताना वाचक त्या परिसरात पोहोचतो. त्यांच्या भाषेत कृत्रिमता नाही, तर मातीतून आलेली सहजता, ओलावा आणि अनुभवांची उब आहे. हा कथासंग्रह बदलत्या वास्तवाचा दस्तऐवज आहे. विकास, विस्थापन, बेरोजगारी, भ्रष्टाचार, जातवास्तव, नातेसंबंध, पाणी, शेती आणि माणसाच्या जगण्याची झुंज या प्रश्नांचा वेध घेणारे कथालेखन वाचनीय आहे.
महामार्ग
लेखक : जगदीश कदम
प्रकाशक : संगत प्रकाशन, नांदेड
पाने : ११८ किंमत : २५० रुपये







