दोन आंदोलने

Contributed byमंगेश वैशंपायन|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
दोन आंदोलने
ल्लीच्या जंतर मंतरवर कधीही गेलं तरी, ‘गांधीजी का जंतर’ हा प्रसिद्ध वाक्प्रचार आठवतो. अण्णा हजारे आंदोलनानंतरचं एक मोठं आंदोलन सध्या इथं सुरू आहे ते ‘नीट’ पेपरफुटीवरून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी, कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) अभिजित दीपके व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली. हे आंदोलन आता अखेरच्या टप्प्यात आल्याची चाहूल लागली. अशा वेळी इथं रात्रीच्या वेळी गेलं की, जंतरमंतरचं वेगळंच रूप दिसतं. गेले ३५ दिवस जंतरमंतरवरच्या गर्दीची रात्रीची झोप हरवली आहे. पिवळट प्रकाश सांडणाऱ्या दिव्यांच्या आडून छद्मीपणे डोकावणारा अंधार असला तरी हजारो तरुणांच्या डोळ्यांत आशेचा उजेड पेटलेला असतो. कुणाच्या हातांतला तिरंगा हवेवर फडकत असतो, कोणाच्या हातात फलक. गर्दीच्या ओठांवर घोषणांचा अखंड नाद... पोलिसांचे जत्थे बॅरिकेड्सच्या मागून बारकाईने गर्दीकडे पाहत असतात. रात्री साडेबारा, दोन, तीन आणि चार वाजतात; पण आंदोलनाची धग कायम असते. बाजूच्या पदपथांवर विश्रांती घेणारे आणि मंचासमोर घोषणा देणारे कार्यकर्ते हे चित्र लोकशाहीतल्या जनआंदोलनाचं वेगळं रूप. पहाटेची आभा पसरत असताना पोलिस, निमलष्करी जवानांची संख्या वाढत जाते, दंगाविरोधी पोलिसी वाहनांचा गराडा पडतो. हेल्मेटधारी जवान आपापल्या जागा घेतात आणि जंतरमंतरचं रूप एका सुरक्षाकवचात अडकलेल्या आंदोलनस्थळात बदलतं. सुरक्षा कडक होत चालली, निशस्त्र विद्यार्थ्यांवर लाठ्याकाठ्या चालल्या, व्यवस्थेनं मेट्रो स्थानकं एकामागून एक बंद करून पाहिली, काही समाजकंटक प्रवृत्तींनी याआडून हात साफ करून घेण्याचे प्रयत्न चालवलेत.

‘सीजेपी’च्या या आंदोलनात जेव्हा जेव्हा जंतरमंतरवरचं दृश्य पाहिलं, तेव्हा तेव्हा मनात पंधरा वर्षांपूर्वीच्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या आंदोलनाचंही वार्तांकन करण्याचा अनुभव आगळावेगळाच होता. जंतर मंतर आणि रामलीला मैदान या दोन्ही ठिकाणी तेव्हा देशभरातून आलेल्या जनसमुदायाने भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता. २०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालचं आंदोलन मुख्यतः भ्रष्टाचाराविरोधातील नैतिक लढा म्हणून उभे राहिलं होतं. तेव्हाचं यूपीए सरकार अगदीच घायकुतीला आलं होतं आणि राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा घोटाळा, २जी स्पेक्ट्रम प्रकरण, आदर्श घोटाळा यांमुळे तरुणांच्या मनात संताप होता. ‘महापुरे झाडे जाती,.. ’अशी मराठीमिश्रित हिंदी बिनदिक्कत बोलणाऱ्या अण्णांचं साधं व्यक्तिमत्त्व आणि गांधीवादी उपोषणानं जनतेच्या मनातल्या त्या संतापाला दिशा दिली. सध्याच्या आंदोलनात उत्साह आहे, पण एक अस्वस्थताही आहे. हजारो पोलिस, बॅरिकेड्स, सीसीटीव्ही, निमलष्करी दलांचा बंदोबस्त आणि निर्बंध यांमुळे आंदोलनाचे स्वरूप अधिक संघर्षमय आहे. संवादापेक्षा करकचून नियंत्रणाला अधिक महत्त्व दिल्याची जी भावना आंदोलकांमध्ये दिसते, ती आपल्यालाही जाणवते.
सामाजिक व्याप्ती हा दोन्ही आंदोलनांतील आणखी एक महत्त्वाचा फरक. अण्णा आंदोलनानं भ्रष्टाचार हा जणू प्रत्येक नागरिकाचा प्रश्न बनवला होता. त्याआधी जणू देशात भ्रष्टाचार झालाच नव्हता, असं काहीतरी लोकांना वाटत असावं. सध्याचं आंदोलन शिक्षण, परीक्षा, रोजगार, पर्यावरण किंवा विशिष्ट धोरणांशी संबंधित प्रश्नांपासून सुरू झालं व नंतर त्यात इतर मुद्दे जोडले गेले. त्यामुळे त्याला सहानुभूती मोठ्या प्रमाणात मिळाली असली, तरी २०११ सारखी सर्वसमावेशक राष्ट्रीय लाट निर्माण करण्याची ताकद यात नाही. २०११मध्ये सरकारविरोधी सर्वव्यापी संताप स्पष्ट जाणवत होता, सध्या त्या प्रमाणात तशी भावना नाही. मुळात या आंदोलनाला सध्याच्या सरकारनं परवानगी दिलीच कशी, हा प्रश्न सूज्ञांना पडला नाही तर देव त्यांचं रक्षण करो! अर्थात टोकाचा व्यक्तिद्वेष असेल तर बोलणंच खुंटलं.

मात्र, तरुणांचा मोठा सहभाग ही एक गोष्ट दोन्ही आंदोलनांना समान धाग्याने जोडते. विदेशी माध्यमांत प्रसिद्धी पण ताज्या आंदोलनावर बहुतांश राष्ट्रीय प्रमुख प्रसार माध्यमांचा अघोषित बहिष्कार,असं चित्र असलं तरी जंतरमंतरवर रात्ररात्र जागणारे, सोशल मीडियावर थेट प्रक्षेपणाच्या व संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळणारे बहुसंख्य युवकच आहेत. दोन वेगवेगळ्या आंदोलनांत तरुणच आंदोलनाचे प्रमुख चेहरे का बनतात? कोणत्याही देशातला तरुण हा असा घटक असतो ज्याला आपल्या भविष्याबाबतची सर्वाधिक असुरक्षितताही भेडसावत असते. २०११ मध्ये भ्रष्टाचारामुळे संधी हिरावल्या जात आहेत अशी भावना तरुणांमध्ये होती. आज त्या भावनेची जागा शिक्षणातील बजबजपुरी, स्पर्धा, नोकरी आणि करिअरच्या अनिश्चिततेने घेतली आहे. २०२६च्या सात महिन्यांत १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवकांमधील बेरोजगारी सुमारे ५.५ ते १५ टक्के आहे. उच्च शिक्षण घेऊनही योग्य रोजगार न मिळणे, स्पर्धा परीक्षांतील अनिश्चितता, भरती प्रक्रिया लांबणे, परीक्षा रद्द होणे किंवा प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना यामुळे तरुणांच्या मनात व्यवस्था त्यांच्या भविष्याबद्दल गंभीर नाही, अशी भावना आहे. सरकार एखाद्या आंदोलनाकडे केवळ एका घटनेची प्रतिक्रिया म्हणून पाहू लागलं तर मूळ प्रश्न समजण्यात गल्लत होऊ शकते. जंतर मंतरची जागती रात्र एक सांगावा जरूर देते की अंधार कितीही गडद असला, तरी पहाटेची चाहूल नेहमी जाग्या असणाऱ्या मनांनाच आधी लागते.

ता. क. - ‘सीजेपी’च्या नीट पेपरफुटीविरोधातल्या आंदोलनाचं जंतर मंतर सुरू झाल्यापासून गेले ३५ दिवस, सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी बनलेला ‘अयोध्या राममंदिरातील दानचोरी’ हा शब्द तरी कोणी ऐकलाय का? बऱ्याच वेळा काळ वेळ, घटना आणि इशारे बरंच काही सांगून जातात.

mangesh.w@timesofindia.com