पंढरीची वारी : पावलांतून साधणारा सहज योग

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पंढरीची वारी : पावलांतून साधणारा सहज योग
षाढी एकादशी म्हटली की वैष्णवांची पावले आपोआप पंढरपूरच्या दिशेने पडू लागतात. मनात एकच हुरहूर असते. आषाढी कधी येईल आणि पांडुरंगाशी भेट कधी होईल? या भेटीच्या ओढीने वारकरी ऊन, पाऊस, थंडी, प्रवासातील अडचणी आणि शरीराचे कष्ट यांची पर्वा न करता पंढरीकडे निघतो. अखेर पांडुरंगाचे दर्शन घेऊन तो कृतकृत्य होतो.

वारीविषयी आजवर अनेक अंगांनी चिंतन झाले आहे. वारी म्हणजे काय, ती चालते कशी, तिचे नियोजन कसे असते, लाखो वारकरी एकाच भावनेने कसे प्रवास करतात, यावर अनेकांनी विचार मांडले आहेत. मात्र या वारीकडे योगशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर तिचे वेगळेच गूढ उलगडते. संतांनी, विशेषतः माऊलींनी, वैष्णवांच्या हातून किती सहजपणे योग साधून घेतला, हे वारीच्या अनुभवातून जाणवते.
एका ठराविक ठिकाणाहून ठराविक काळात पायी चालत पंढरपूरला जाणे, याला आपण वारी म्हणतो. परंतु येथे केवळ ‘चालणे’ अभिप्रेत नाही. त्यासाठी अधिक योग्य शब्द आहे ‘विहार’. चालण्यात कष्ट जाणवू शकतात; पण विहारात आनंद असतो. वारकरी पंढरीकडे कष्टाने चालत नाही, तर आनंदाने विहार करीत जातो. त्याच्या प्रत्येक पावलात नाम असते, प्रत्येक श्वासात विठ्ठल असतो आणि प्रत्येक क्षणात भेटीची आस असते.

योगशास्त्रात कुंडलिनी जागृती, षट्चक्रांचे वेधन, साधना , नियम, संयम अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्या मार्गाला अभ्यास, शिस्त आणि अंतर्मुखता लागते. परंतु वारीच्या माध्यमातून संतांनी एक विलक्षण सहज मार्ग उघडला. वारकरी नाम घेत चालतो, कीर्तन ऐकतो, हरिपाठ म्हणतो, दिंडीत राहतो, देहाचे कष्ट विसरतो आणि नकळत अंतर्मनातील साधना सुरू होते. हेच वारीचे वैशिष्ट्य आहे.

वारकऱ्यांच्या आचारात चार गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. अष्टगंध-बुक्का लावणे, एकादशीचे व्रत करणे, नित्यनेमाने हरिपाठ म्हणणे आणि वारी करणे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘ पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत.’ त्यांच्या दृष्टीने वारी हेच व्रत, हेच साधन आणि हेच जीवनधर्म होते.

वारीचा आरंभ ज्या क्षणी होतो, त्या क्षणी भक्तीची गंगा प्रवाहित होऊ लागते. ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’, ‘श्री ज्ञानदेव तुकाराम’ या नामघोषाने वातावरण भरून जाते. पहाटे काकडा, संध्याकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन आणि चालता चालता अखंड नामस्मरण हा सारा भक्तीचा प्रवाह आहे. दिंडी जिथे मुक्कामाला थांबते, तिथे कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचे अमृत मिळते. अशा रीतीने भक्तीगंगा आणि ज्ञानगंगा यांचा सुंदर संगम घडतो.

या संगमात कर्माची गंगा मात्र गुप्तपणे मिसळलेली असते. जशी त्रिवेणीत सरस्वती गुप्त आहे, तशी वारीत कर्मयोगाची धार अदृश्य असते. वारकरी कोणतीही अपेक्षा न ठेवता घरदार सोडून निघतो. ‘मला हे मिळावे, माझे दुःख दूर व्हावे, मला सुख लाभावे’ अशी इच्छा त्याच्या प्रवासाची प्रेरणा नसते. उलट पंढरीच्या दिशेने पावले पडत जातात तशी दर्शनाची ओढ अधिक तीव्र होत जाते. आत काय घडते, हे वारकऱ्यालाही सांगता येत नाही; पण काहीतरी विलक्षण रूपांतर मात्र सुरू असते.

म्हणूनच वारीला केवळ यात्रा म्हणणे पुरेसे नाही. जसा भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, तशी वारीही एक योगमार्ग आहे. योग म्हणजे जोडणे. ज्या साधनेने जीव भगवंताशी जोडला जातो, ती साधना योग ठरते. वारी वारकऱ्याला पंढरीशी, पांडुरंगाशी आणि शेवटी स्वतःच्या अंतरात्म्याशी जोडते. म्हणून वारी हा सहजयोग आहे.

सामान्य योगक्रियेला शरीराची मर्यादा, वयाचे बंधन, काळ-परिस्थितीची अडचण असू शकते. पण वारीचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे. लहान मुले, तरुण, वृद्ध, स्त्रिया, पुरुष सगळे एका भक्तिप्रवाहात सामील होतात. वारी सुरू झाली की ‘मी चालतो आहे’ हेही विसरले जाते. जेवणाची सोय होईल का, झोपायला जागा मिळेल का, शरीर साथ देईल का, या चिंता मागे पडतात. ‘तो वाट दावी करी धरून’ अशी अनुभूती येते. पांडुरंगच हात धरून चालवतो, अशी वारकऱ्याची भावना होते.

आज अनेक साधने उपलब्ध आहेत. बस, रेल्वे, विमान यांमुळे पंढरपूरला सहज पोहोचता येते. मग पायी चालत जाण्याचे महत्त्व काय, असा प्रश्न विचारला जातो. याचे रहस्य साधे पण गूढ आहे. आपण आपल्या पायांनी चालत जातो आणि पंढरीत पोहोचून पांडुरंगाच्या पायांचे दर्शन घेतो. आपल्या पावलांचा प्रवास त्याच्या चरणांशी एकरूप होतो. चालणारा जीव आणि ज्याच्यापाशी पोहोचायचे ते परब्रह्म ही वारीची खरी अनुभूती आहे.

जशी नदी प्रवास करत करत समुद्राला मिळते आणि समुद्रस्वरूप होते, तशी वारकरी जीवाची अवस्था होते. ‘आता न फिरे माघारी, बैसलो शेजारी गोविंदाची’ अशी स्थिरता त्याला लाभते. पंढरपुरात नामदेवराय देवाच्या पायरीशी आहेत. वैष्णवाला देवाच्या पायाशी स्थान आहे. म्हणूनच पददर्शनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

योगशास्त्राच्या भाषेत विचार केला तर मूलाधारापासून स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार या चक्रांमधून होणारा कुंडलिनीचा प्रवास म्हणजेही एक आंतरिक वारीच आहे. पण माऊलींनी हा मार्ग कठीण ठेवला नाही. ‘ज्ञानराज माझी योग्याची माऊली’ या भावनेने त्यांनी योग्यांवर आणि भक्तांवर कृपा केली. ‘नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळिया, सुख देईल विसावा रे’ असे सांगत त्यांनी नाम, भक्ती आणि चालण्यातून सहज साधना दिली.

वारकरी पंढरपुरात पोहोचतो आणि पांडुरंगाच्या चरणी मस्तक टेकवतो, तेव्हा त्याचा बाह्य प्रवास पूर्ण होतो; पण खरा अंतर्मुख प्रवास तेथेच सुरू होतो. सद्गुरूची कृपा झाली की साधक अधिक उन्नत अवस्थेकडे जातो. सहस्रारस्थ परब्रह्माशी तादात्म्य साधण्याचा मार्ग खुला होतो. वारी म्हणजे केवळ पंढरीपर्यंतचा प्रवास नाही, ती जीवातून शिवाकडे नेणारी अनुभूती आहे.

म्हणूनच जीवनात एकदा तरी वारीचा योग साधावा. मनुष्यजन्म लाभला आहे, तो केवळ संसारासाठी नाही; तर भगवंताशी नाते दृढ करण्यासाठी आहे. वारी आपल्याला निखळ आनंद, समर्पण, नामस्मरण आणि सहज योग यांचा अनुभव देते. पंढरीश पांडुरंगाची कृपा सर्व वैष्णवांवर राहो, हीच प्रार्थना. रामकृष्ण हरी!