Prime Minister Housing Scam 18 Billion Corruption Exposed
‘पंतप्रधान आवास’मध्ये १८ कोटींचा कथित घोटाळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुंबई : पंतप्रधान आवास योजना-शहरीअंतर्गत गरजू लाभार्थ्यांसाठी वितरित करण्यात आलेल्या सुमारे १८ कोटी रुपयांच्या निधीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी पाच नगरपरिषदांच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाडाच्या दक्षता विभागाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. दक्षता विभागाच्या तक्रारीनुसार, २०१८ ते २०२२ या कालावधीत केंद्र आणि राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या अनुदान निधीची पडताळणी करताना हा प्रकार उघडकीस आला. लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत जमा होणे अपेक्षित असलेला निधी परस्पर अन्य खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तपासात परभणी जिल्ह्यातील पाथरी नगर परिषदेत दोन कोटी रुपये, सोनपेठ नगर परिषदेत दोन कोटी ५८ लाख रुपये, मानवत नगर परिषदेत तीन कोटी ५८ लाख रुपये, जालना जिल्ह्यातील परतूर नगर परिषदेत आठ कोटी ३२ लाख रुपये, तर नांदेड जिल्ह्यातील माहूर नगर परिषदेत दोन कोटी सात लाख रुपयांच्या निधीत कथित अनियमितता झाल्याचा आरोप आहे.
विहिरीत आढळला मृतदेह पुणे : धायरी परिसरातील अजिंक्यतारा मित्र मंडळ गल्लीतील एका विहिरीत गुरुवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. शंभूदेव मोहन मोहिते (वय ४३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच नवले अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तांडेल आर. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चालक चव्हाण, फायरमन पवार व गुरव, तसेच मदतनीस बालाजी आणि शिवम यांनी बचावकार्य केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढला.