विसावा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
विसावा
ज आषाढी एकादशी. आज पंढरपुरी जायचे नि सावळ्या विठूमाउलीची मूर्ती डोळे भरून पाहायची, अथवा मग मंदिराचा कळस डोळा भरून देखायचा नि मनोमन त्याचे चरण पूजायचे. ही विठूमाउली... या माउलीचे समचरण यांचे वारकऱ्यांच्या मनात स्थान काय? तर, पंढरीस जाणारे आणि न जाणारे देखील... त्यांच्या लेखी विठूमाउली, माउलीचे चरण म्हणजे विसावा! विसावा साधासुधा नाही, जिवाचा विसावा.

‘विश्राम’ या संस्कृत शब्दापासून उपजून मायमराठीत विसावा हा शब्द विसावला म्हणतात. पण विसावा शब्दातला जिव्हाळा, त्यातील निवांतता विश्राम या शब्दात नाही. म्हणून तर आपल्या संतांनी हा शब्द त्यांच्या रचनांत अनेकदा, मुक्तहस्ते गोवलेला आढळतो.
‘माझा विसावा माहेर पंढरपूर वो, ऐशी वाट पाहातसे जरु...’ असे ज्ञानदेव लिहून जातात. तर, ‘भागल्यांचा तूं विसांवा, करी गांवा निंबलोण...’ या शब्दांत संत तुकाराम महाराज भक्तांच्या आयुष्यातील विठ्ठलाचे स्थान अधोरेखित करतात. ‘मुक्ताबाई म्हणे देवा, तु विसावा जीव शिवा’ असे म्हणत मुक्ताबाई माणसाच्या जगण्यावर विठ्ठलभक्तीचे शिंपण करून जातात. तर, ‘नामा म्हणे करा करुणा केशवा, तूं माझा विसावा पांडुरंगा’ अशा शब्दांत संत नामदेव विठुमाउलीविषयीची आर्तता नोंदवतात.

असा हा शब्द... विसावा. आराम व त्यासारखे शब्द आहेतच मराठीत व हिंदीसारख्या भाषांतही; पण विसावा या शब्दात जो ठहराव आहे तो अन्य शब्दांत नाही आढळायचा. विसावा या शब्दाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात केवळ शरीरास मिळालेली विश्रांती, आराम एवढेच गृहीत धरले जात नाही; तर मनाला मिळालेली विश्रांती ही स्थिती या शब्दाला बिलगून येते. या मानसिक विश्रांतीसोबत येतो तो मानसिक आधार. पंढरपूर, विठूमाउलीचे चरण हे स्थान विसाव्याचे... कारण तेथे लाभतो आधार आणि सोबत. हा आधार, ही सोबत जगण्याच्या दुर्घट वाटा चालण्यास बळ देणारी. हे बळ डोळ्यांत पाणी आणणारे. पाणी कृतज्ञतेचे आणि निःसंदर्भ आनंदाचेही...

विसावा



विसावा