The Shocking Transfer Of Embryos At Malti Ivf Center
‘त्या’ भ्रूणांचे हस्तांतरण
Contributed by: नाशिक|महाराष्ट्र टाइम्स•
बदलापूर येथील कथित स्त्री बीज तस्करी प्रकरणी नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द झाल्यानंतर या सेंटरकडे असलेले २४ गोठवलेल्या भ्रूणबाबत ( एम्ब्रीओ) आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आरोग्य विभागाने सेंटरची मान्यता रद्द करण्याच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर सेंटर पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न मावळले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने या सेंटरकडे असलेले २४ गोठवेले भ्रूण जोडप्यांच्या संमतीने अन्य सेंटर्सकडे वळवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या भ्रूणची तपासणी करण्यासह पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत त्यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देशही वैद्यकीय विभागाला दिले आहेत.
बदलापूर येथील स्त्री बीज तस्करी प्रकरणात गोविंद नगर येथील मालती आयव्हीएफ सेंटर चा सहभाग असल्याचे मार्चमध्ये समोर आले होते. मालती आयव्हीएफ सेंटर ला नाशिक महापालिकेने नोंदणी परवाना दिला असताना परवान्याचा वापर बदलापूर येथे होत असल्याचे समोर आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने मालती आयव्हीएफ सेंटर सील करत तेथील कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्यानंतर सदर केंद्राची नोंदणी देखील रद्द करण्यात आली होती. महापालिकेच्या या कारवाई विरोधात मालती आयव्हीएफ सेंटरने आरोग्यमंत्री प्रकाश आबिट यांच्याकडे अपिल दाखल केले होते. आबिटकर यांच्या मंत्रालयातील दालनात सुनावणीनंतर महापालिकेने केलेली कारवाई योग्य ठरविण्यात आली होती. त्यामुळे मालती आयव्हीएफ सेंटरला आता टाळे लागणार असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयानेही संबंधित सेंटरला दिलासा दिलेला नाही. मालती आयव्हीएफ सेंटरकडे असलेले २४ गोठवलेले भ्रूण अन्य सेंटरकडे जोडप्याच्या परवानगीने हस्तांतरीत करण्याचे निर्देश दिल्यानंतर वैद्यकीय विभागाने या भ्रूणची तपासणी केली आहे. तसेच वैद्यकीय विभागाने संबंधित सेंटरला न्यायालयीन आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. सदरची प्रक्रिया वैद्यकीय विभागाच्या निगराणीखाली राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेची कागदोपत्री जबाबदारीदेखील संबंधित सेंटरवर टाकली आहे. त्यामुळे आयव्हीएफचा उपयोग घेणाऱ्या जोडप्यांना आता आपल्या पसंतीचे सेंटर निवडता येणार आहे.