The Uniqueness Of Experiencing Dindi A Celebration Of Devotion In Pandharpur
एक तरी वारी अनुभवावी...
Contributed by: नारायण वसंतराव लांडगेरा. पैठण|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
भेटी लागे जीवा लागलीसे आस |
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ||हे विठ्ठला, माझ्या जीवाला तुझ्या भेटीची ओढ लागली आहे. म्हणून मी रात्रंदिवस फक्त तुझीच वाट पाहत आहे. हीच तळमळ पंढरपूरच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असते.
वारी म्हणजे काय?
जी गोष्ट सारखी-सारखी केली जाते, वारंवार केली जाते ती वारी. एकटा माणूस पंढरपूरला जाऊ शकतो; पण वारीसाठी समूह लागतो; कारण वारी ही सामूहिक उपासना आहे आणि ती सातत्याने करणारा म्हणजे, वारकरी. अविचारावर विचाराने वार करणारा, अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि चमत्काराला मुठमाती देणारा तो खरा वारकरी आहे.
वारकरी संप्रदायाची सर्वांत मोठी शिकवण म्हणजे, संसारात राहून परमार्थ. भगवंतासाठी वनात जाणे, मोठे यज्ञ-याग, तपश्चर्या करण्याची गरज नाही.
न लगती सायास जावे वनंतरा |
सुखे येतो घरा नारायणा ||
ठायीच बैसोनी करा एक चित्त |
आवडी अनंत आळवावा ||
घरात राहून, प्रपंच सांभाळून, एकचित्ताने नाम घेतले, तरी नारायण घरी येतो. आजच्या काळात बुवाबाजी आणि भोंदूगिरी वाढत असताना संत साहित्याची, त्यांच्या विचारांची गरज अधिकच आहे.
वारी : भक्तीचा सोहळा
आणि महाराष्ट्राचा वारसा
वारी हा भक्तीचा सोहळा, आनंदाचा मेळा आणि जगण्याचा उत्सव आहे. मनुष्य जन्माचे सार्थक म्हणजे, वारी. पंढरीच्या वारीला ७०० वर्षांची अद्वितीय सांस्कृतिक परंपरा आहे. दर वर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत जातात. हा केवळ पावलांचा प्रवास नाही, तर समता, शिस्त आणि भक्तीचा महासंगम आहे.
एका आख्यायिकेनुसार, वारीची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी केली. आळंदी, देहू, त्र्यंबक येथून निघणाऱ्या पालख्यांचा प्रवास सुमारे १५ ते २० दिवसांचा असतो. पाऊले चालती पंढरीची वाट - या वाटेवर एक पाऊल फक्त अंतर कापते, तर दुसरे पाऊल अंतरंग शुद्ध करते. षडरिपूंना पायदळी तुडवून अभंगातून मुक्त होता येते, हेच वारी शिकवते.
प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे म्हणतात, ‘ज्या देशातील लोक पंढरपूरला जातात त्याचे नाव महाराष्ट्र.’ खरोखरच वारी हा महाराष्ट्राचा वारसा आणि वैभव आहे.
संत साहित्यात वारीचा उल्लेख पदोपदी आढळतो. संतांनी आपल्या अभंगातून वारीचे महत्त्व पटवून दिले.
संत नामदेव महाराज म्हणतात - पंढरीची वारी | जयाचिये कुळी | त्याचे पाया धुळी लागू मज ||
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात - माझ्या जीवीची आवडी | पंढरपूरा नेईन गुढी ||
संत तुकाराम महाराज म्हणतात - पंढरीची वारी आहे माझे घरी | अनेक न करी तीर्थव्रत ||
संत एकनाथ महाराज म्हणतात - एका जनार्दनी करी वारी | धन्य तोचि बा संसारी ||
संत जनाबाई म्हणतात - ये ग ये ग विठाबाई | मज पंढरीची वाट दावी ||
पंत आणि तंत काव्यापेक्षा संत काव्य लोकांना जवळचे वाटले. तेराव्या शतकातील ज्ञानेश्वर-नामदेवांपासून एकनाथ-तुकोबांपर्यंत संतांनी मराठी भाषा समृद्ध केली. त्याच समृद्ध मराठीला छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राजव्यवहार कोश काढून राजभाषेचा मान दिला.
संत साहित्याने मराठीला आत्मा दिला आणि छत्रपतींनी मराठी माणसाला पाठीचा कणा आणि स्वाभिमानी बाणा दिला. तुकोबाही म्हणतात - शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचिया...
वारीची शिकवण : समता, शिस्त आणि मानवता
वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे कोणताही दुजाभाव नाही.
भेदाभेद भ्रम अमंगळ, या रे या रे लहान थोर, सकळांशी येथे आहे अधिकार...
विठ्ठलावर सर्वांचा समान अधिकार आहे.
सातशे वर्षांची परंपरा असलेली वारी आपल्याला खूप काही शिकवते.
शिस्त - कोणतीही पोलिसी यंत्रणा नसताना दिंडी एका शिस्तीत मार्गक्रमण करते. ‘भुता परस्परे जडो मैत्र जीवांचे’ या तत्वाने वारकरी जगतो.
व्यवस्थापन - आज-काल सभा असो, की मोठा कार्यक्रम त्यासाठी जाहिरात, बॅनर, सोशल मीडिया लागतो; पण वारीला कुठलेही निमंत्रण नसताना लाखो वारकरी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तिरी जमा होतात. हे खरे ‘ह्युमन मॅनेजमेंट’ आहे.
ऊर्जा आणि आरोग्य - शेकडो किलोमीटर पायी चालूनही चेहऱ्यावर थकवा नसतो, फक्त आनंद असतो. वारी सहजपणे व्यायाम घडवते.
बंधुता - एकत्र चालणे, राहणे, एकत्र जेवण वारीत होते. भेदाभेद भ्रम अमंगळ प्रत्यक्षात उतरतो. वारी कम्युनिटी लाइफ शिकवते.
विनम्रता - पाया पडती जन एकमेका. नम्रतेने झुकल्याने माणूस खुजा होत नाही. त्याचे अंतःकरण विशाल होते. वारीत सर्वांना माउली म्हणण्याची पद्धत हीच विशालता दाखवते.
समाधानी वृत्ती - प्रत्येकाला गाभाऱ्यातील दर्शन मिळतेच असे नाही; पण कळस जरी दिसला, तरी आंतरिक समाधान मिळते.
साधेपणा - विठ्ठलाला सोने-चांदी नको, त्याला फक्त दोन हात आणि एक मस्तक हवे. तो पान-फुलांत राजी होणारा देव आहे. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || बाह्य अवडंबरापेक्षा अंतरंगाचे सौंदर्य महत्त्वाचे हेच संत चोखामेळा सांगतात.
वारी हा जगण्याचा उत्सव आहे. म्हणूनच इथे गीत आहे, संगीत आहे, नृत्य आहे. विणेचा झंकार, टाळांचा खणखणाट, पखवाजाचा ताल आहे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई | नाचती वैष्णव भाई रे | हे ज्ञाना-नामा-एका-तुका-जनाचे अभंग सूर्य-चंद्र असेपर्यंत भंग पावणार नाहीत.
थोडक्यात, वारी म्हणजे एक प्रशिक्षण आहे. एकांतापेक्षा लोकांतात राहून, कमी खर्चात, अल्प साधनात समाधानाने जगण्याचा आणि जीवनाचा उत्सव साजरा करण्याचा धडा वारी देते.