चांदोरीत बिबट्याचा थरार

महाराष्ट्र टाइम्स
चांदोरीत बिबट्याचा थरार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
गडेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत चांदोरी गावात रात्री धुमाकूळ घालत दोन शेळ्या ठार करणाऱ्या बिबट्याने शुक्रवारी सकाळी गावातील एका शौचालयात ठाण मांडले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेले चांदोरीचे उपसरपंच जितेंद्र रहाटे आणि ग्रामस्थ मंगेश झोडे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. वनविभागाच्या ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ने घटनास्थळी दाखल होत सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर शौचालयात दडून बसलेल्या बिबट्याला शिताफीने जेरबंद केले.

चांदोरी गावात रात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्याने सर्वप्रथम गुलाब हातझाडे यांच्या गोठ्यात प्रवेश करून चार महिन्यांच्या शेळीच्या पिल्लावर झडप घातली आणि त्याला जागीच ठार केले. या घटनेची माहिती गावात पसरत असतानाच बिबट्याने शेजारील रमेश हातझाडे यांच्या गोठ्यातील शेळीवरही हल्ला करून तिला ठार केले. सलग दोन ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्रभर धुमाकूळ घातल्यानंतर सकाळच्या सुमारास हा बिबट दडण्यासाठी सुरक्षित जागा शोधत मोरेश्वर हातझाडे यांच्या घराजवळील शौचालयात जाऊन बसला. सकाळी ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात येताच गावात खळबळ उडाली. पहाटे ५ ते सकाळी १० वाजतापर्यंत बिबट्या शौचालयात लपून बसला होता. दिवसाढवळ्या गावाच्या मध्यभागी बिबट्या असल्याची बातमी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वन विभागाच्या चमूने बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश मिळवले.