Unique Water Conservation Project Of Yogeshwari Educational Institution Solves Serious Water Issues
जलसंवर्धनाचा योगेश्वरी पॅटर्न
Contributed by: डॉ. शिरीष खेडगीकरछत्रपती संभाजीनगर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
बाजोगाई (जि. बीड) येथील स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेने गेल्या बावीस-तेवीस वर्षांत संस्थेच्या शाळा आणि महाविद्यालय परिसरात सुरू करून यशस्वी केलेले जलसंवर्धनाचे अभिनव उपक्रम महाराष्ट्रातील सर्व शिक्षणसंस्थाकरिता दिशादर्शक ठरले आहेत. संस्थेच्या ३५ एकर परिसरात करण्यात आलेल्या जलसंवर्धनाच्या प्रकल्पामुळे दर वर्षी दोन कोटी लिटर पावसाचे पाणी जमिनीत मुरविले जाते. हा प्रयोग केवळ पाणी साठवण्यापुरता मर्यादित नसून, तो भविष्यातील जलसुरक्षेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठरला आहे.
सन २००३मध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या नेतृत्वाखाली ‘ जलसंवर्धन अभियान’ सुरू झाले. या अभियानाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, पर्यावरणीय आणि राष्ट्रीय मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प करण्यात आला. परिसराचा भूगर्भीय अभ्यास करून छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ स्थापत्य अभियंता चंद्रशेखर बर्दापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारणाची शास्त्रशुद्ध योजना तयार करण्यात आली. योगायोग असा की, आज ते या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. संस्थेच्या विविध परिसरांमध्ये तलाव, सोक पीट, मॅजिक पीट, वॉटर बँक, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा विविध माध्यमांतून पाणी जमिनीत मुरविण्याची व्यवस्था उभारण्यात आली आहे. परळी रस्त्यावरील संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ कला व वाणिज्य महाविद्यालय परिसरातील मोठ्या जलाशयात एक कोटी १२ लाख लिटर पाणी मुरवण्यात आले.योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या परिसरात २० हजार लिटर पाणी मुरवण्यात आले. संस्थेच्या मांडवा रस्त्यावरील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या गोदावरीबाई कुंकूलोळ कन्या विद्यालयाच्या परिसरात श्रमदानातून तयार केलेल्या तळ्यात १,८४,००० लिटर पाणी मूरवण्यात आले.
योगेश्वरी विद्यालयाजवळ श्रमदानातून तळे तयार करून ५० हजार लिटर पाणी मुरवण्यात आले; तसेच तीस शोषखड्डे (सोक पीट) तयार करून वॉटर बँकद्वारे पाणी मुरविण्यात आले. विद्यार्थी वसतिगृह परिसरात सहा लाख लिटर पाणी आणि राष्ट्रीय छात्रसेना कार्यालयाजवळ तीन लाख लिटर पाणी मॅजिक पीटमध्ये मुरवण्यात आले. परिसरात वरील सर्व प्रकल्प आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे दर वर्षी सुमारे दोन कोटी लिटर पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे परिसरात पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे.
या जलसंधारणाचा लाभ केवळ संस्थेलाच झाला नाही, तर परिसरातील सुमारे २०० विहिरी व बोअरवेलमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. वसतिगृहात रहिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, परिसरातील नागरिकांप्रमाणे उद्यानातील पक्षी आणि प्राणीदेखील या उपक्रमाचे ‘लाभार्थी’ झाले आहेत. या जलसंधारणामुळे परिसरातील जैवविविधता वर्षागणिक संपन्न होत आहे.
जलसंवर्धनासोबतच संस्थेने वृक्षसंवर्धनालाही तितकेच महत्त्व दिले आहे. परिसरात विविध सव्वाशे प्रजातींचे चार हजार वृक्ष वाढले आहेत. परिसरात वेगवेगळ्या जागी आठ सुंदर उद्याने आहेत. शहीद स्मृती उद्यान आणि ‘एक पेड शहीद के नाम’सारखे उपक्रम प्रशंसनीय आहेत. प्रत्येक वृक्षाजवळ एका शूर शहीद जवानाचे नाव लावले असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृतीबरोबरच राष्ट्रभक्तीची भावनाही अधिक दृढ झाली आहे. संस्थेने नव्याने सुरू केलेल्या योगेश्वरी सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांकरिता हा उपक्रम विशेष प्रेरणादायी ठरत आहे. या सैनिकी शाळेचे प्राचार्य मेजर एस. पी. कुलकर्णी यांनी राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रमदान, जलसंधारण आणि वृक्षसंवर्धनाचा प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा लाभ दिला. त्यामुळे पर्यावरण हा केवळ अभ्यासक्रमातील विषय न राहता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन दिनक्रमाचाच एक भाग बनला आहे.
अंबाजोगाईच्या योगेश्वरी शिक्षण संस्थेचा हा प्रयोग राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकरिता आदर्शवत ठरला आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणे, जिरवणे आणि भूगर्भात मुरवणे हा केवळ पर्यावरणपूरक उपक्रम नसून, तो राष्ट्रधर्म आहे. जलसंवर्धन ही लोकचळवळ बनली तरच दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि पर्यावरणीय असंतुलनावर मात करता येईल. जलसंवर्धनाचा हा ‘योगेश्वरी पॅटर्न’ राज्यातील अन्य संस्था, शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरावा, ही अपेक्षा!
(लेखक छत्रपती संभाजीनगर
येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे विश्वस्त आहेत.)