Warning To Citizens Due To Rising Water Levels In Godavari River
गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
वैजापूर : नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने जलसंपदा विभागाने नांदूर मधमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सुरू केला आहे. परिणामी, गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, नदीकाठी राहणाऱ्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांनी शुक्रवारी सरला बेट परिसरास भेट देऊन आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेबाबत सूचना दिल्या.
या वेळी नदीकाठी असलेल्या अन्या गावांतील नागरिकांनीही जागरूक राहावे, सुरक्षेबाबत काळजी घ्यावी अशा सूचना तहसीलदारांनी केल्या आहेत. तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावर डोणगाव, बाबतरा, लाखगंगा, वांजरगाव, नांदूरढोक, बाभुळगाव, बाजठाण, चेंडूफळ, शनि देवगाव, हमरापूर, अव्वलगाव, नागमठाण, डाग पिंपळगाव, भालगाव, पुरणगाव, सावखेड गंगा ही गावे आहेत.