‘एसआयआर’ मोहिमेला वेग

Contributed byमुंबई|महाराष्ट्र टाइम्स
‘एसआयआर’ मोहिमेला वेग
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
महाराष्ट्रातील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पडताळणी मोहिमेला (एसआयआर) वेग आला असून, राज्यातील जवळपास ८६.९४ टक्के मतदारांपर्यंत गणना अर्ज पोहोचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील नऊ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांपैकी आठ कोटी ५० लाख ७१ हजार ७७१ मतदारांना मतदार पडताळणीसाठीचे अर्ज वितरित करण्यात आले आहेत.

या मोहिमेंतर्गत प्राप्त अर्जांचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत पाच कोटी ७२ लाख ६१ हजार ३८० अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, हे प्रमाण एकूण मतदारसंख्येच्या ५८.५२ टक्के आहे. राज्यभरात या कामासाठी एक लाख २५३ बीएलओ कार्यरत आहेत. ही मोहीम आठ ऑगस्टपर्यंत चालेल. या मोहिमेवर निवडणूक आयोगाचे लक्ष असून, आठ ऑगस्टपूर्वी शंभर टक्के अर्ज वितरण पूर्ण करण्याचे; तसेच त्यानंतर डिजिटायझेशनची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनांना देण्यात आले आहेत.
राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये अर्ज वितरण आणि डिजिटायझेशनचा वेग राज्याच्या सरासरीपेक्षा कमी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. अंतिम मुदतीपूर्वी या जिल्ह्यांतील उर्वरित मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान निवडणूक प्रशासनासमोर आहे.