Not Orders Communication With Children Is Necessary Mohan Bhagwat
‘आदेश नव्हे, मुलांशी संवाद हवा’
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘सध्याच्या पिढीच्या मुलांना आदेश देण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. निर्देशांपेक्षा संवादावर अधिक भर दिला पाहिजे’ अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी विद्यार्थी आंदोलनावर सूचक भाष्य केले.
‘युगानुकूल मातृत्व’ या विषयावर बोलताना भागवत यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत अप्रत्यक्ष टिप्पणी केली. ‘आपण आपल्या मनाप्रमाणे वागू शकत नाही आणि सत्तेच्या जोरावर सर्वांचे मालक होऊ शकत नाही’ असे ते म्हणाले. ‘पहिल्या १२ वर्षांतील मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आपल्या हातात आहे. आपण त्यांना माहिती पुरवली पाहिजे. आज तुम्ही ताठर भूमिका घेऊ शकत नाही. मुलांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागते. ते भौतिक प्रभाव आणि चहूबाजूंनी होणाऱ्या प्रचाराने प्रभावित झालेल्या वातावरणात मोठे होत आहेत. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला त्यांना मदत केली पाहिजे’, असेही ते म्हणाले.
‘हिंदू देवतांविषयी
पाठ्यपुस्तकांत माहिती हवी’
‘पालकांनाही मुलांच्या धर्माविषयीच्या प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजेत. मुले अनेकदा हिंदू देवतांविषयी प्रश्न विचारतात. परंतु पालकांना अनेकदा त्यांची उत्तरे देता येत नाहीत. मुले विचारतात की, या देवाला हत्तीचा चेहरा का आहे? मात्र त्याचे उत्तर आई-वडिलांकडे नसते. या गोष्टी अगदी सुरुवातीपासूनच पाठ्यपुस्तकांमध्ये असायला हव्यात’, असे भागवत म्हणाले.