अनाहतची विक्रमी कामगिरी

Contributed byनवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अनाहतची विक्रमी कामगिरी
भारताची नवोदित स्क्वॉशपटू अनाहतसिंगने शुक्रवारी रात्री इतिहास घडवला. तिने जागतिक ज्युनिअर स्क्वाश स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जोश्ना चिनप्पाने २००५च्या स्पर्धेत ही कामगिरी केली होती. त्यानंतर २१ वर्षांनी प्रथमच भारतीय खेळाडू या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार आहे.

दिल्लीकर अनाहतने इजिप्तच्या बार्ब सामेह हिला ११-३, ८-११, ११-४, ११-६ असे हरवून अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत २०व्या असलेल्या अनाहतला गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेत ब्राँझपदकावर (उपांत्य फेरीत पराभव) समाधान मानावे लागले होते. या वेळी तिने आँतारिओ (कॅनडा) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एक पाऊल पुढे टाकले आहे.
उपांत्य फेरीतील विजयामुळे अनाहत खूश होती. काही महिन्यांपूर्वी तिला ब्रिटीश ज्युनिअर स्पर्धेत बार्बविरुद्ध हार पत्करावी लागली होती या वेळी मात्र सरस ठरल्याचे अनाहतला समाधान होते. ‘अंतिम फेरीतील प्रवेशाचा; तसेच बार्बला पराभूत केल्याचाही आनंद आहे. काही महिन्यांपूर्वी ब्रिटीश स्पर्धेत आमच्यातील लढत खूपच चुरशीची झाली होती. त्यामुळे या वेळी आव्हान सोपे नसणार याची जाणीव होती. त्या आव्हानास मी यशस्वीपणे सामोरे गेले याचे मला समाधान आहे,’ असे अनाहतने सांगितले.

‘उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात माझा खेळ चांगला झाला नव्हता. काही चुकाही झाल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती टाळण्यात यशस्वी ठरले. त्याचबरोबर मी काय करू शकते हेही दाखवून दिले. ही माझी चौथी जागतिक ज्युनिअर स्पर्धा आहे. यापूर्वी उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत पराभूत झाले आहे. यामुळे अंतिम फेरीतील प्रवेश जास्त सुखावत आहे. माझ्या या कामगिरीमुळे आई-वडिल प्रशिक्षकांना आनंद झाला आहे, त्याचे मला समाधान आहे. मात्र, स्पर्धा अजून संपलेली नाही याची जाणीव नक्कीच आहे,’ असे तिने आवर्जून सांगितले. अनाहतची लढत आता इजिप्तच्याच रुकाया सालेमविरुद्ध आहे. रुकायाला स्पर्धेत दुसरे मानांकन आहे.