Announcement Of Insurance Protection For Govindas Safety
गोविंदांच्या सुरक्षेसाठी सकारात्मक
Contributed by: मुंबई|महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
दहीहंडी उत्सवानिमित्त राज्यातील सुमारे दोन लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी ही मागणी शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत संबंधित विभागाला तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.
सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या पत्रात गोकुळाष्टमी आणि दहीहंडी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद केले होते. राज्यभरातील लाखो गोविंदा जीव धोक्यात घालून दहीहंडी उत्सवात सहभागी होतात. सरावादरम्यान तसेच प्रत्यक्ष दहीहंडी फोडताना अनेक गोविंदांना दुखापती होतात. अनेक गोविंदा मंडळांची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्याने उपचारांचा खर्च उचलणे कठीण जाते. त्यामुळे राज्यातील सर्व गोविंदांना व्यापक विमा संरक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होते.यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे एक लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. यंदा हा लाभ वाढवून सुमारे दोन लाख गोविंदांना ‘महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन’ या नियोजन समितीच्या माध्यमातून विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी सरनाईक यांनी केली होती.
या मागणीची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रावर, ‘याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी’, अशी नोंद करून संबंधित यंत्रणेला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. गोविंदांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे लाखो गोविंदांना दिलासा मिळेल आणि गोकुळाष्टमीचा उत्सव सुरक्षित वातावरणात साजरा होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.