‘धर्मेंद्र प्रधान ही पहिली विकेट आहे, परंतु ही केवळ सुरवात आहे, आम्ही येथे थांबणार नाही’, असा इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सरकारला दिला. तर, ‘हा लोकशाहीचा विजय आहे’, अशा शब्दांत सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या या विजयाचे वर्णन केले.
राजधानी दिल्लीत जंतरमंतरवर शनिवारी दुपारीही हजारो विद्यार्थी जमले होते. दिल्लीतील प्रचंड उकाड्यामुळे वातावरणात उत्साह असला तरी काहीशी मरगळही होती. परंतु दुपारी अडीचच्या सुमारास प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी येऊन धडकली आणि येथील वातावरण क्षणार्धात जादूची कांडी फिरावी तसे पाहता पाहता बदलून गेले. ‘झुरळांना आव्हान देऊ नका’, असा इशारा दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना दिला. `सुबह हो गयी मामू`, असा तिखट हल्ला त्यांनी मोदी यांच्यावर चढविला.
नीट पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपापल्या जिल्ह्यांत शनिवारी सायंकाळी मेणबत्ती मोर्चा काढावा, असे आवाहन दीपके यांनी देशभरातील विद्यार्थ्यांना केले. उत्साही विद्यार्थ्यांनी दीपके यांना उलचून खांद्यावर गेतले तेव्हा दीपके यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उंचावला.
टायफाॅइडशी झुंज देतानाही या आंदोलनात सहभागी झालेले दीपके यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्याशिवाय विद्यार्थ्यांचे आंदोलन समाप्त करण्यासाठी सुरवातीला नकार दिला होता. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, विद्यार्थ्यांना क्रूर मारहाण करणाऱ्या गुंड पोलिसांवर कारवाई करावी आणि ‘चलो संसद मोर्चा’तील विद्यार्थ्यांवरील खटले मागे घ्यावेत या मागण्या सरकारने लेखी मान्य केल्याशिवाय जंतरमंतर सोडणार नाही, असा निर्धार दीपके यांनी प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही व्यक्त केला. त्यानंतर केंद्रीय मंत्री जे पी नड्डा व जितेंद्र सिंह यांच्याशी चर्चा करण्यासाठी सीजेपीचे सौरव दास व आशुतोष रांका काॅन्स्टिट्यूशन क्लबकडे रवाना झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व पोलिसांवर घणाघाती हल्ला करताना, ‘संघाचे व पोलिसांचे गुंड येथे तरी आम्ही हलणार नाही’, असेही दीपके म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या संदीप लांबा यांच्यासह अधिकाऱ्यांचा नामोल्लेख करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. ‘या देशाच्या युवकांनी दाखवून दिले की ते एकत्र आले तर कोणालाही ते झुकवू शकतात. प्रधान यांच्या राजीनाम्यावर, इस्तिफे नही होते म्हणणाऱ्यांना दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये, असे उत्तर मिळाले आहे’, असे ते म्हणाले. ‘प्रधान यांचा राजीनामा हा संविधानाचा, देशातील युवकांचा विजय आहे’, अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘झुरळांना क्षुल्लक समजू नका, ते काहीही करू शकतात’, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
‘या यशाबद्दल मला हीरो करू नका कारण एका माणसाला संविधानापेक्षा, देशापेक्षा, व्यवस्थेपेक्षा मोठे केले, त्यानेच देशाचे वाटोळे केले’, असे सांगताना दीपके यांनी नामोल्लेख न करता पंतप्रधानांवर हल्लाबोल केला.