भाजी विक्रेत्याने जिंकलेभारताचे पहिले पदक

Contributed byनवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
भाजी विक्रेत्याने जिंकलेभारताचे पहिले पदक
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचे पहिले पदक पॅरा पॉवरलिफ्टर झंडूकुमारने जिंकले. त्याने शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास पदक निश्चित केले. या कामगिरीसह जगण्यासाठी भाजी विकलेल्या बिहारमधील युवकाने भारताचे खाते उघडले.

स्पर्धा सुरू झाली त्या वेळी तो तुलनेत दुय्यम असलेल्या ‘ब’ गटात होता; मात्र त्याने १३०.९ वजन पेलून पदकासाठी दावेदारी सादर केली. त्याने रौप्यपदक विजेत्यापेक्षा केवळ शंभर ग्रॅम वजन कमी उचलले. व्हिलचेअरवर बसलेल्या झंडूला अश्रू आवरत नव्हते. त्याच वेळी त्याला सुवर्णपदक आपल्यापासून दूरावल्याची खंत वाटत होती. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील हरनौत गावातील हा युवक काही महिन्यांपूर्वी पहाटे चार वाजता उठत होता. खासगी वाहनास लटकून २० किमीचा प्रवास करून बिहार शरीफ येथील भाजी मार्केटला जात होता. त्यातील अखेरचे एक किलोमीटरचा प्रवास चालतच असे.
घरात कमालीची गरिबी, त्यामुळे दहा वर्षांचा असल्यापासून कुटुंबीयांना भाजी विकण्यासाठी मदत करावी लागली. त्यामुळे शाळेत जाण्याचा प्रश्नच नव्हता. याच सुमारास अचानक त्याने दबंग चित्रपट पाहिला. पाय नसले, तरी आपण सलमानसारखी वरची बॉडी असण्यासाठी प्रयत्न करू शकतो, असा त्याने विचार केला. मित्रांच्या मोबाइलवर व्हिडीओ पाहून व्यायाम सुरू केला. त्यांच्याच मदतीने त्याने जिममध्ये जाण्यास सुरुवात केली. कमी वजन असूनही तो जास्त वजन पेलत असल्याचे पाहून तेथील प्रशिक्षकांनी त्याला पॉवरलिफ्टिंगसाठी तयार करण्यास सुरुवात केली. स्पर्धा सहभाग सुरू झाला. त्यानंतरही भाजी विक्री सुरूच होती; मात्र प्रश्न संपले नव्हते. तो बसत असलेल्या जागेवर छापा पडला. त्याचे दुकान बंद करण्यात आले. त्याने ई-रिक्षा चालवण्याचा प्रयत्न केला; मात्र पॉवरलिफ्टिंग जास्त आकर्षित करीत होते. राष्ट्रीय स्पर्धेत अपयश आले; मात्र प्रशिक्षकांनी गुणवत्ता हेरली. त्याला गांधीनगर येथील अकादमीत दाखल करून घेण्यात आले आणि त्याची प्रगती सुरू झाली ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकापर्यंत सध्या पोहोचली आहे.

बोल्समध्ये यश कायम

रुपाराणी तिर्की आणि पिंकीसिंह या भारतीय जोडीने बोल्सच्या महिला दुहेरीतील यशोमालिका कायम राखली. त्यांनी तोंगाला ५-२, ०-६, १-० असे पराभूत केले. भारतीय संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. त्यांची आता नामिबिया आणि इंग्लंडविरुद्धची लढत शिल्लक आहे. पुतुल सोनमोवालने शुक्रवारी रात्री दुसरा विजय मिळवताना फॉकलंड आइसलँड्सच्या सेसिल अलेक्झांडरला पराभूत केले.

जलतरणात पिछेहाट

श्रीहरी नटराजचे ५० मीटर बॅकस्ट्रोकमधील आव्हान शुक्रवारी रात्री उपांत्य फेरीतच आटोपले. तो २५.२९ सेकंद या वेळेसह सर्वांगीण क्रमवारीत ११वा आला. दक्षण शशिकुमार आणि आर्यन नेहरा ४०० मीटर फ्रीस्टाइलच्या अंतिम फेरीपासून दूर राहिले. शशिकुमार (३ मि. ५८.०९ सेकंद) आणि आर्यन (४ मि. ०.२६ सेकंद) हे अनुक्रमे १५वे आणि १६वे आले.

मार्केटच्या परिसरात त्याची तीन चाकी गाडी उभी असे. लहानपणी पोलिओ झाल्यामुळे अपंगत्व आले होते; मात्र त्याची फिकीर न करता तो त्या गाडीवरून दिवसभर कार्ले, भेंडी अन्य भाजा विकत असे. कमालीची स्पर्धा असल्यामुळे भाजी विकली जाईल, याची खात्री नसे; मात्र खेळाच्या प्रेमाखातर तो चार वाजता विक्री बंद करून वर्कआउटसाठी जात असे. मात्र, तो हे सर्व सुरुवातीस कुटुंबीयांपासून लपवूनच करत होता.