‘बेकायदा हातभट्ट्यांवर कारवाई केल्यानंतरही अनधिकृतरित्या दारू उपलब्ध होते. त्यामुळे हातभट्टीची दारू अधिकृत करा. या माध्यमातून राज्य सरकारला महसूल मिळेल’, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. तसेच त्यातून हातभट्ट्यांवर नियंत्रण राहील, असेही आठवले यांनी सांगितले.
भिवंडीत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या मंत्री आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हातभट्टीच्या दारूप्रश्नी मत व्यक्त केले. ‘हातभट्टीच्या दारूमुळे आजवर हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी बेकायदा हातभट्ट्या सुरू असून नशेसाठी त्यात वेगवेगळी रसायने टाकली जातात. या प्रकारामुळे गोरगरिबांचा मृत्यू होतो’, असे ते म्हणाले.
‘पोलिसांनी कितीही हातभट्ट्यांवर धाडी टाकल्या तरीही त्या हातभट्ट्या सुरूच असतात. परदेशी वाइन शॉपला परवानगी आहे. त्यामुळेच हातभट्टीची दारू अधिकृत करा, हे माझे व्यक्तिगत मत आहे’, असे आठवले यांनी सांगितले.






