मुंबई : नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाच्या इमारतीची राज्य सरकारकडे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता या इमारतीची सखोल स्ट्रक्चरल तपासणी केली जाणार असून, त्यानंतर सरकार कार्यालयांचे स्थलांतर करण्याची सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी बुधवारी केली. इमारतीच्या मुख्य प्रवेशभागाचे महाराष्ट्राच्या वैभवाला साजेसे आकर्षक व सुशोभित स्वरूप विकसित करण्यासाठी देशातील नामांकित वास्तुविशारद व तज्ज्ञ संस्थांचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचनाही त्यांनी केली.
‘राशप’चा वर्धापनदिन
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन बुधवारी १० जून रोजी मुंबईत साजरा करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात हा वर्धापनदिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वर्धापनदिनी निर्णायक भूमिका घेण्यात येणार असून भविष्यातील पक्षाच्या वाटचालीविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच, विलीनीकरणाविषयी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार काय भाष्य करतात याकडेही पक्षातीलच नव्हे तर इतर पक्षीय नेत्यांचेही लक्ष लागून असेल.
‘बहिणींचा विश्वासघात’
मुंबई : भारतीय जनता पक्ष महायुतीने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजनेतून महिना १५०० रुपये देऊन विधानसभा निवडणुकीत महिलांची मते घेतली. आता सत्तेत आल्यानंतर या सरकारला निकष, अटी, शर्थी दिसू लागल्या आहेत. सरकारने निकष लागू करत ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्याचा क्रूर निर्णय घेतला आहे. मते हवी होती त्यावेळी कोणतेही निकष न पाहता योजना जाहीर केली आणि सत्ता मिळाल्यानंतर मात्र निकष आठवले, ही लाडक्या बहिणींची क्रूर थट्टा व विश्वासघात आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.
चिमुकल्याची हत्या
मिरा-भाईंदर : काशिमिरा येथे एका चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह सोमवारी आढळून आला. उघड्या नाल्यात पडून त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज सुरुवातीला व्यक्त केला जात होता. मात्र, तपासादरम्यान त्याची हत्या करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी मृत मुलाच्या आईचा प्रियकर शंभू शर्मा ऊर्फ नेपाळी याला काशिगाव पोलिसांकडून मंगळवारी अटक करण्यात आली आहे.
सोनेचोरांना बेड्या
कल्याण : रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून कोट्यवधी रुपयांचे सोने चोरी करणाऱ्या टोळीला सहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून १ कोटी ६२ लाख २७ हजार रुपये किंमतीचे १ किलो ९८.५०० ग्रॅम सोन्याच्या लगडया जप्त केल्या आहेत. रमेश बाळू डीकोळे , फुलचंद उर्फ परमेश्वर उर्फ सरपंच छगन गुंजाळ, धनराज उर्फ धनंजय उर्फ धन्या साहेबराव गुंजाळ आणि पुणेकर उर्फ शिवण्या सीताराम डिकोळे अशी आरोपींची नावे आहेत.
दिव्यांग तरुणीवर अत्याचार
नवी मुंबई : खारघरमधील एका १७ वर्षीय दिव्यांग मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेत एका तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पीडिता चार महिन्यांची गरोदर राहिली असून, वैद्यकीय तपासणीत हा प्रकार समोर आला. खारघर पोलिसांनी संशयिताचा शोध घेऊन त्याला अटक केली.






