मे महिन्यामध्ये देशात दाखल होण्याची अपेक्षा असलेला मान्सून अखेर देशाच्या उंबऱ्यापाशी येऊन उभा राहिला आहे. केरळमध्ये आज, गुरुवारी मान्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या आनंदवार्तेसोबतच मुंबईमध्ये बुधवारी सकाळी तुरळक ठिकाणी पावसाने अचानक हजेरी लावल्याने काही वेळ उकाड्यापासून दिलासाही मिळाला. मुंबईत कमाल तापमानही काहीसे खाली आले.
मान्सूनची रेषा ३० मेनंतर पुढे सरकलेली नसली तरी २४ तासांमध्ये मान्सून केरळमध्ये प्रगती करू शकतो, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने ३ जून रोजी जाहीर केली. केवळ केरळच नाही तर तमिळनाडूचा काही भाग, अरबी समुद्राचा आग्नेय आणि नैर्ऋत्य भाग, लक्षद्वीप बेटे या संपूर्ण भागांमध्ये मान्सूनचे वारे पसरतील अशीही शक्यता आहे.






