शहरात पाणीबाणी कायम

महाराष्ट्र टाइम्स

छत्रपती संभाजीनगर शहरात पाणीबाणी कायम आहे. महापालिका वाढीव पाणी पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करत आहे. नवीन योजनेतून १२ जूनपर्यंत २०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे पाणी पुरवठ्यातील खंड कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या १७० एमएलडी पाणी उपलब्ध असूनही अनेक भागात आठव्या-दहाव्या दिवशी पाणी येत आहे. वाढीव पाण्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल.

शहरात पाणीबाणी कायम
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेचे लक्ष वाढीव पाण्यावर लागले आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेतून १२ जूनपर्यंत २०० एमएलडी वाढीव पाणी उपलब्ध करून देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे, त्यामुळे यंत्रणा कामाला लागल्या आहेत. १२ जूनपर्यंत किमान ५० एमएलडी पाणी वाढेल, त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होईल, अशी माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. वाढीव पाण्यामुळे पाणी पुरवठ्यातील खंड किमान दोन दिवसांनी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

शहरासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पाणी पुरवठा योजनांमधून रोज सुमारे १७ कोटी लिटर (१७० एमएलडी) पाणी उपलब्ध होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होऊनदेखील पाणीबाणी कायम असल्याचे चित्र आहे. शहराच्या काही भागात आठव्या - दहाव्या दिवशी पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहराला जायकवाडीच्या नाथ सागरातून पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान ७०० आणि १२०० मिलीमीटर व्यासाच्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत आहे. त्याशिवाय ९०० मिलीमीटर व्यासाची योजनादेखील कार्यरत आहे. ९०० मिलीमीटर व्यासाची योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे सध्या ९०० आणि १२०० मिलीमीटर व्यासाच्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून १३० ते १३५ एमएलडी पाणी उपलब्ध होते, तर ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून ४० ते ४५ एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. दोन्हीही योजनांच्या माध्यमातून १७० ते १७५ एमएलडी पाणी दररोज शहरासाठी उपलब्ध होते. शहराचा विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता किमान २४० एमएलडी पाण्याची गरज आहे.

१७० ते १७५ एमएलडी पाणी उपलब्ध होऊनदेखील शहरात पाणीबाणी कायम असल्याचे चित्र आहे. जयविश्वभारती कॉलनी, मरिमाता परिसर , सिडको एन-८, रामनगर, मुकूंदवाडी, भीमनगर-भावसिंगपुरा, पडेगाव आदी भागातील पाणी पुरवठ्यात विशेष सुधारणा झालेली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. यापैकी अनेक भागांना आठव्या-दहाव्या दिवशी पाणी पुरवठा होत असल्याचे बोलले जात आहे. पाणी पुरवठ्यातील खंड वाढल्यामुळे या भागांमधील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.‘ शहराच्या अन्य भागात सहाव्या दिवशी पाणी पुरवठा होत असताना काही भागांना आठव्या - दहाव्या दिवशी पाणी पुरवठा का?, असा प्रश्न विचारला जात आहे.