खासदार कोट्यातून ‘एमएमआरडीए’ने बांधलेली घरे स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवून डोंगरीमध्ये अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाच ते सहा जणांकडून एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेऊन त्यांना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी पाच आरोपींच्या विरोधात डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ायफान मकबूल शेख यांच्या तक्रारीवरून युनूस शेख, सचिन यादव, हनुमंत देवधरकर, अक्षय रूपवते आणि फैजल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुनर्वसन योजनेअंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी एमएमआरडीएने कुर्ला कुरेशीनगर येथे घरे बांधली आहेत. यातील घरे तत्कालीन खासदार राहुल शेवाळे यांच्या कोट्यातून स्वस्तात मिळू शकतात असे आश्वासन संशयितांनी दिले. त्यावर विश्वास ठेवत पाच जणांनी एक कोटी १२ लाख रुपये दिले. संशयितांनी बनावट शिक्के आणि सह्या असलेली बनावट वाटप पत्रे आणि ताबा पावत्या दिल्या. त्याआधारे पाच जणांनी या सदनिकांमध्ये प्रवेश केला. फ्लॅट्स नावावर हस्तांतरित केले जाऊ शकत नाहीत हे समजल्यावर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.






