पोलिस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहतूक पोलिसांनी दोघांकडून एक चाकू आणि एक तलवार ताब्यात घेतली. ताब्यात घेतलेल्यांची नावे स्वयंम उर्फ गोल्डी सुनील सांवत (रा. भावसिंगपुरा) आणि करण विलास गुंजाळ (रा. राऊतनगर, ता. अंबड, जि. जालना) अशी आहेत.
या प्रकरणात शहर वाहतूक शाखा क्रमांक दोनने माहिती दिली. आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर विनाहेल्मेट वाहनचालकांवर कारवाई केली जात होती. दुचाकीस्वार वाहनचालकांची तपासणी केली जात होती. त्यावेळी अलंकार हॉटेलच्या समोर दोन जण आपसात भांडण करीत होते. सायंकाळी सातला हा प्रकार घडला. जुबिली पार्ककडून जाणाऱ्या एका नागरिकाने अलंकार हॉटेलजवळ दोन युवक भांडत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांना दिली. त्यानंतर वाहतूक शाखेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी एका दुचाकीजवळ दोन युवक आपसात वाद घालीत होते. या दोघांना वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांची नावे स्वयंम उर्फ गोल्डी सांवत आणि करण गुंजाळ अशी असल्याचे समोर आले.
या दोघांच्या हालचाली संशयास्पद होत्या. यामुळे वाहतूक पोलिसांनी दोघांची झडती घेतली. या झडतीत स्वयंम सांवत याच्या खिशातून धारदार चाकू, तर करण गुंजाळ याच्या कमरेजवळून लहान आकाराची तलवार ताब्यात घेण्यात आली.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. ही शस्त्रे ते का बाळगत होते, याबाबत तपास केला जात आहे.






