खमंग चवीचे वांग्याचे काप

Contributed byमुग्धा बापट|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आईच्या हातच्या वांग्याच्या कापांची चव आजही आठवते. आईने अनेक पदार्थ शिकून घेतले. सुरळीची वडी आणि हांडवा हे पदार्थ गुजराती भाभींकडून शिकली. वांग्याचे काप बनवण्याची सोपी पद्धत दिली आहे. आईच्या हातच्या पदार्थांची आठवण पुढच्या पिढीलाही आनंद देते. आई अनारसेही उत्तम बनवायची.

खमंग चवीचे वांग्याचे काप

झी आई वयाच्या चौदाव्या वर्षी लग्न करून भोर इथं आली. हळूहळू स्वयंपाक शिकून ती सुगरण झाली. तिचा प्रत्येक पदार्थ चविष्ट. पाकातले चिरोटे, सुरळीची वडी, सांडगे-कांदा-पापड आमटी, वांग्याचे काप , पुरणपोळी, कांदा भजी, खोबरं व शेंगदाणे घालून केलेली, तळलेली कुरकुरीत हरभरा डाळ, चित्रान्न, हांडवा... हे आणि असे अनेक पदार्थ ती फारच छान बनवत असे.

आमच्या शेजारी एक गुजराती भाभी राहत असत. त्यांच्याकडून आई सुरळीची वडी आणि हांडवा हे पदार्थ शिकली. या हांडव्याच्या अनेक आठवणी आहेत. आमच्या घरात शेवटच्या पडवीत, चुलीवर एका मोठ्या पितळी जाड बुडाच्या पातेल्यात, खालीवर निखारे ठेवून हा पदार्थ ती शिजायला ठेवायची. सगळं घर त्या खमंग वासानं दरवळून उठायचं. का कुणास ठाऊक; पण आम्ही या पदार्थाला आजवर ‘पातेलं’ असं संबोधत आलोय. सुरळीच्या वड्यांची गमतीदार आठवण म्हणजे, एकदा पाहुण्यांसाठी आईनं सुरळीच्या वड्या करून फडताळात ठेवल्या. पाहुणे जेवून गेल्यावर लक्षात आलं, की त्या तशाच राहिल्यात. मग आम्ही सगळे खूश झालो. वाळवणाच्या पदार्थांत सांडगे, पापड, तांदळाच्या पापड्यांबरोबर काही अफलातून गोष्टी; जसं की, उभा चिरलेला कांदा ती उन्हात वाळवून ठेवायची. कोवळ्या गवारीच्या शेंगा वाळवून, तळून त्यावर तिखट-मीठ भुरभुरलं, की खूप भारी लागतात.

वांग्याच्या कापांसाठी साहित्य व कृती : वांगी पातळ कापून मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवायची. एक वाटी हरभरा डाळीचं पीठ, दोन चमचे तांदळाचं पीठ, दोन चमचे बारीक रवा, तिखट, हळद, मीठ, धने-जिरे पूड, ओवा, पांढरे तीळ, खसखस, धुवून, वाळवून, बारीक चिरलेली कोथिंबीर... हे सगळं नीट मिसळून त्यात पाण्यात बुडवलेले काप दोन्ही बाजूनं घोळवून पॅनवर शॅलो फ्राय करायचे. पहिली बाजू एक-दीड मिनिट झाकून वाफवायची. मग उलटल्यावर झाकण ठेवायची गरज नाही. दुसरी बाजूही भाजून घेतली, की खमंग चवीचे काप खायला तयार. हे गरमगरमच छान लागतात.

माझ्या जावयाची फर्माइश असलेला हा पदार्थ करताना आईची मायेची चव आठवते. अधिक महिना असल्यानं आठवलं, आई अनारसेही अप्रतिम बनवायची. माझ्या मुलीला आजीच्या हातचे चिरोटेही खूप आवडतात. आईचे सर्व पदार्थ पुढच्या पिढीलाही आनंद देतात, हे मात्र खरं!