रेशन दुकानांचे मागील सहा महिन्यांपासूनचे कमिशन (मार्जिन मनी) थकीत आहे. ते तत्काळ खात्यावर जमा करण्यात यावे, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने केली आहे.
यासंदर्भात विभागीय पुरवठा उपायुक्त, जिल्हा पुरवठा अधिकारी, तसेच संबंधित तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे. शासनाने थकीत कमिशन तत्काळ अदा न केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही महासंघाने दिला आहे.
महासंघाने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्वस्त धान्य दुकानदारांचा संपूर्ण उदरनिर्वाह शासनाकडून मिळणाऱ्या कमिशनवर अवलंबून आहे.
मिळणाऱ्या या रकमेतूनच दुकानाचे वीज बिल, वाहतूक खर्च, मापारी, भाडे तसेच इतर दैनंदिन खर्च भागविले जातात. मात्र, मागील सहा महिन्यांपासून कमिशन मिळाले नाही. त्यामुळे रेशन दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाच्या नियमानुसार दर महिन्याला कमिशन जमा होणे अपेक्षित आहे. तथापि, अद्यापही प्रलंबित रक्कम जमा करण्यात आलेली नसल्याने दुकानदारांमध्ये नाराजी आहे.
या निवेदनावर छत्रपती संभाजीनगर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गंगाधर पवार, उपाध्यक्ष पुंडलिकराव आंभोरे, सचिव श्रीमंत बोंगाणे, संजय साळवे, ज्योतीराव जाधव, कैलास पारखे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.






