आजीच्या हातचे बाजरीचे मुटकुळे

Contributed byपंकजा जोशी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आजीच्या हातच्या बाजरीच्या मुटकुळ्यांची चव आजही आठवते. आजीने बनवलेले हे पदार्थ नेहमीच स्वादिष्ट असत. हिवाळ्यात नाश्त्याला किंवा भाजी-पोळीचा कंटाळा आल्यावर ती मुटकुळे बनवायची. बाळंतिणींसाठी हा खास पदार्थ होता. बाजरीच्या पिठात डाळीचे पीठ, मसाले आणि लसूण घालून हे मुटकुळे बनवले जात. पातेल्यात तेल घालून त्यावर मुटकुळे ठेवून वाफवले जात. तुपासोबत लिंबाचे लोणचे घालून याची चव अजूनच वाढायची.

grandmas special bajra mutkule a taste of tradition

झी आजी; तिला आम्ही मोठी आई असं म्हणत असू. ती जाऊन २८ वर्षं झाली; पण अजूनही तिच्या हातची चव विसरायला होत नाही. तिच्या हातचा कोणताही पदार्थ चांगला झाला नाही, असं कधीच व्हायच नाही. कोणतंही माप ठरलेलं नाही; सगळं अंदाजे हातानं, पण चव अगदी खमंग, स्वादिष्ट असे. तिच्या हातचे बाजरीचे मुटकुळे म्हणजे, क्या बात! हिवाळ्यामध्ये सकाळी नाश्त्याला किंवा कधी संध्याकाळी भाजी पोळीचा कंटाळा आला, तर ती मुटकुळे बनवायची. बाळंतिणींना तर हमखास हा नाश्ता ती बनवायची आणि बाळंतिणींबरोबर आम्ही सगळे त्यावर ताव मारायचो.

बाजरीच्या पिठात थोडं डाळीचं पीठ घालून, त्यात तिखट, मीठ, हळद, हिंग, थोडं तेल आणि भरपूर लसूण घालून मध्यम मळायचं. मग एका मोठ्या पितळाच्या पातेल्यात खाली तेल घालून, त्यावर दोन्ही हातांच्या तळव्यांवर एक एक मुटकुळा वळून त्यात सोडायचा. पुन्हा वरून थोडं तेल टाकून पातेलं गॅसवर ठेवायचं. त्याच्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी टाकायचं. पाण्याला आधण आलं, की ते पाणी मुटकुळ्यांवर ओतायचं आणि परत झाकण ठेवून त्यावर पाणी टाकायचं. मग मधून हलवत मस्त वाफ आणायची. या पदार्थावर छान तूप टाकून सोबत लिंबाचं लोणचं म्हणजे आहाहा! काही जण याला शेंगोळे म्हणतात; पण तिला हा शब्द मान्य नसल्यामुळे आम्ही याला ‘मोठी आई स्पेशल मुटकुळे’ असंच म्हणतो. तिची आठवण काढून मी हा पदार्थ नेहमी करते; पण तिची सर येत नाही.