पावसाच्या प्रतीक्षेत खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांसमोर यंदा वाढत्या उत्पादन खर्चाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर मशागतीच्या दरात मोठी वाढ झाली असून, नांगरणीपासून पेरणीपर्यंतच्या सर्व कामांसाठी शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ट्रॅक्टरद्वारे केल्या जाणाऱ्या विविध शेतीकामांच्या दरात २०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. नांगरणीसाठी एकरी दोन हजार ते २२०० रुपये आकारले जात होते. त्यासाठी आता अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. सोयाबीन व इतर पारंपरिक पिकांच्या पेरणीसाठी एकरी दीड हजार रुपये, तर मका पेरणीसाठी १६०० ते १८०० रुपये आकारले जाण्याची शक्यता आहे.
रोटाव्हेटरच्या कामासाठी एकरी अडीच हजार, तर फणणी अथवा पाळीसाठी १२०० रुपये खर्च येत आहे. जेसीबीच्या कामाचे दरही प्रतितास हजार रुपयांवरून १२०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे मशागतीचे दर वाढविणे अपरिहार्य झाल्याचे ट्रॅक्टर चालकांचे म्हणणे आहे.
दर आणखी
भडकण्याची शक्यता
सध्या उपलब्ध असलेल्या इंधन दरांच्या आधारे हे नवीन दर निश्चित करण्यात आले असले तरी येत्या काळात डिझेलचे दर आणखी वाढल्यास मशागतीचा खर्चही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एकीकडे मान्सूनचे अनिश्चित आगमन आणि दुसरीकडे वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे. पेरणीपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी अनेक शेतकरी कर्ज अथवा उसनवारीचा आधार घेत आहेत. वाढत्या खर्चामुळे शेतीचा आर्थिक ताळमेळ बिघडत असल्याची भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.






