ऑकलंड : भारतीय क्रिकेट संघ या वर्षी २२ ऑक्टोबर ते १ डिसेंबर या कालावधीत एका प्रदीर्घ मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दहा मर्यादित षटकांचे सामने खेळवले जाणार आहे. उभय देशांत आयोजित केली जाणारी ही पुरुषांची आतापर्यंतची सर्वांत मोठी द्विपक्षीय क्रिकेट मालिका असेल. या दौऱ्यात भारतीय संघ पाच टी-२०, पाच वन-डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दोन्हीं देशांमधील क्रीडा संबंधांना १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मालिका एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. भारताचा हा दौरा एकूण ४० दिवसांचा असणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा विजय
लाहोर : ऑस्ट्रेलियाने मालिकेतील तिसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात यजमान पाकिस्तानवर ४१ धावांनी मात केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया - ५० षटकांत ९ बाद २३१ (कॅमेरून ग्रीन ५३, जोश इंग्लिस ५१, मॅट रेणशॉ ४३, शाहीन शाह आफ्रिदी ३-३६) वि. वि. पाकिस्तान - ४४ षटकांत सर्व बाद १९० (शादाब खान ७१, नॅथन एलिस ४-३३, मॅथ्यू शॉप्स ३-३६).
भारत उपांत्य फेरीत
काकामिगहारा (जपान) : भारताने १८ वर्षांखालील मुलांच्या गटाच्या आशिया कप हॉकी स्पर्धेत चायनीज तैपेईवर १३-१ अशी मात केली. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताच्या मुलींच्या संघाने सिंगापूरवर २५-० असा दणदणीत विजय मिळवला. या लढतीआधीच भारताने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. उपांत्य फेरीतील संघ अद्याप निश्चित झालेले नाहीत.






