‘जीवनात जे काही घडत असते, त्यानुसार आपण शिकत असतो. आपला खेळही त्यानुसार होतो. दैनंदिन जीवनात केलेल्या संघर्षामुळेच मी क्रिकेट मैदानावर प्रत्येक परिस्थितीत लढण्यास तयार झालो,’ हे उद्गार आहेत अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याचे. कृणाल आयपीएल टी-२० क्रिकेटमध्ये विजेतेपद राखलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघातील प्रमुख खेळाडू. त्यांने प्रतिकूल परिस्थितीत उंचावलेल्या कामगिरीचा बेंगळुरू संघाच्या कामगिरीत मोलाचा वाटा होता.
कृणालने बुधवारी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या इमारतीत संवाद साधताना क्रिकेट विषयक अनेक विषयांवर भाष्य केले. तो संघात असताना ‘मुंबई इंडियन्स’ने आयपीएल तीनदा जिंकली होती, तर आता ‘बेंगळुरू’ संघाने लागोपाठ दोनदा. त्याने फिरकी गोलंदाजीत झालेले बदल, खेळाडूंच्या वयापेक्षा त्यांची तंदुरुस्ती किती आहे, चाहत्यांचे लाभणारे प्रेम, मुलगा कवीरकडून होणारी त्याच्या खेळाबाबतची विचारणा यासह अनेक विषयांवर मते व्यक्त केली. त्यातही कृणालने आपल्याला जीवनाने कसे मैदानावरील संघर्षासाठी तयार केले हे आवर्जून सांगितले.
‘मैदानावरील आव्हान खडतर असताना सर्व परिस्थितीचा विचार करून त्यास सामोरे जातो. कदाचित जीवनाने मला जे शिकवले तसाच मैदानात मी खेळत आहे. मी ११-१२ वर्षांचा असताना वडिलांबरोबर काम करीत होतो. ते पासपोर्ट सल्लागार एजंट होते. वडील जे काही काम करीत होते, त्यातून मला जीवनाचे धडे मिळाले. आई-वडिलांचे काम पाहून जीवनात किती संघर्ष आहे, याची मला जाणीव झाली,’ असे कृणालने सांगितले. ‘वडिलांसह काम करताना मीही पासपोर्ट एजंट झालो. लोकांसाठी रेशन कार्डचे काम करीत होतो. कार ब्रोकर म्हणूनही काम केले. जीवन काय असते, हे मला खूप कमी वयात कळले. तिथे मी हार मानली नाही. मैदानातही तेच करतो,’ असेही अहमदाबादच्या कृणाल पंड्याने सांगितले.






