शहरातील ‘रोटी बँके’तर्फे काश्मीरमध्ये भोजनसेवा

Contributed byसपोर्ट ट्रस्ट,रोटी बँक सेवा ट्रस्ट|महाराष्ट्र टाइम्स

शहरातील रोटी बँक आता काश्मीरमध्ये मदतीचा हात देणार आहे. श्रीनगर येथील शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजनसेवेचा उपक्रम सुरू होत आहे. गुरुवारपासून रोज गरजूंपर्यंत जेवण पोहोचवले जाईल. सुरुवातीला ७५ किलो अन्न तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. नंतरच्या टप्प्यात यात्रेकरू आणि भाविकांपर्यंतही हा उपक्रम पोहोचवण्याचा मानस आहे.

launch of roti bank food service in kashmir

या उपक्रमाचे उद्घाटन गुरुवारी काश्मिरी पुलावाने होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून दाल-चावल, चावल-सब्जी असे विविध पारंपरिक जेवण दिले जाणार आहे. साधारणपणे रोज ७५ किलोंचे अन्न तयार करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असून, यातून कित्येकांना मोठा आधार मिळण्याची आशा आहे. हा उपक्रम सुरळीत सुरू झाल्यावर नंतरच्या टप्प्यात अमरनाथ यात्रेकरूंना तसेच वेगवेगळ्या सांस्कृतिक उत्सवांतील भाविक व नागरिकांपर्यंत या उपक्रमाचा विस्तार करण्याचा प्रयत्न असेल, असे ‘ रोटी बँक सेवा ट्रस्ट’चे युसुफ मुकाती व ‘सपोर्ट ट्रस्ट’च्या डॉ. लुब्ना खान यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

शहर परिसरातील शेकडो गरजू व्यक्तींपर्यंत रोज जेवण पोहोचवणारी ‘रोटी बँक’ ही काश्मीरमध्ये मदतीचा हात देण्यासाठी सज्ज झाली आहे. श्रीनगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या दुर्गम भागातील रुग्णांच्या नातेवाइकांना रोज जेवण देण्याचा संकल्प ‘रोटी बँक’ने केला आहे आणि हा उपक्रम गुरुवारपासून (४ जून) सुरू होत आहे. पुढच्या टप्प्यात यात्रेकरूंसह भाविकांपर्यंत उपक्रमाचा विस्तार करण्याचा संस्थेचा मानस आहे.

‘रोटी बँक सेवा ट्रस्ट’ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जिन्सी-बायजीपुरा भागात अन्नदानाचा उपक्रम चालवला जातो. घराघरातील तसेच लग्नकार्य व इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांतील अतिरिक्त अन्नाचे संकलन करून हे अन्न चांगल्या अवस्थेत गरजू व गोरगरिबांपर्यंत पोहोचवले जाते. त्यासाठी अनेक जण आपल्या घरातील अतिरिक्त अन्न ‘रोटी बँके’च्या कार्यालयात आणून देतात, तर विविध कार्यक्रमांतील अतिरिक्त अन्नाचे संकलन ‘रोटी बँके’मार्फत केले जाते. हेच संकलित अन्न 'रोटी बँक'च्या काउंटरवरून रोज ७०० ते ८०० गरजू व गोरगरीबांपर्यंत पोहोचवले जाते. कुणीही यावे आणि अन्नदानाचा लाभ घ्यावा, अशा पद्धतीने ‘रोटी बँक’चा उपक्रम चालतो. लग्नकार्याच्या दिवशी किंवा इतर कार्यक्रमांमुळे खूप जास्त संकलित झालेले अन्न घाटीतील रुग्णांच्या नातेवाइकांना तसेच गोरगरीबांच्या वस्त्यांमध्येही वितरित केले जाते. त्यामुळे अतिरिक्त अन्नाची नासाडी न होता अधिकाधिक गरजूंची क्षुधाशांती होण्याच्या दृष्टीने ‘रोटी बँक’ आपापल्या परीने योगदान देत आहे. हेच कार्य काश्मीरमध्ये करण्यासाठी ही संस्था सज्ज झाली आहे. त्यासाठी काश्मीर येथील ‘सपोर्ट ट्रस्ट’ या संस्थेच्या माध्यमातून श्रीनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाइकांसाठी हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. श्रीनगर येथील याच एकमेव मोठ्या सरकारी रुग्णालयात लांबून व दुर्गम भागातून अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. यातील बहुतांश रुग्ण गोरगरीब व सामान्य कुटुंबातील असल्याने त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची श्रीनगर येथे मोठी आबाळ होते. हेच लक्षात घेऊन रुग्णांच्या नातेवाईकांना मदतीचा हात देण्यासाठी हा उपक्रम गुरुवारपासून सुरू केला जात आहे. अर्थातच, या नातेवाइकांना ‘रोटी बँक’कडून अन्नदान होईल. त्यासाठी ‘सपोर्ट ट्रस्ट’च्या माध्यमातून हे अन्न रोजच्या रोज तयार करून वितरित केले जाणार आहे.