नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन हा जागतिक बुद्धिबळातील सध्याचा सर्वोत्तम खेळाडू. त्याच्याविरुद्धचा विजय विरळाच असतो. भारताच्या आर. प्रज्ञानंदने एकाच स्पर्धेत (नॉर्वे क्लासिक) कार्लसनला दोनदा पराभूत करण्याची कामगिरी केली. कार्लसन एकाच स्पर्धेत पराजित होण्याचा प्रसंग १९ वर्षांनंतर घडला. यापूर्वी, विश्वनाथन आनंदने लिनारेस स्पर्धेत ही कामगिरी केली होती.
प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील आठव्या फेरीत काळ्या मोहरा असतानाही कार्लसनला पराभूत केले. त्याने याच स्पर्धेत २७ मे रोजी पांढऱ्या मोहरा असताना कार्लसनला पराभूत करण्यात यश मिळवले होते. या दुहेरी साखळी स्पर्धेच्या इतिहासात कार्लसनला एकाच वर्षी दोन्ही डावांत पराभूत करणारा प्रज्ञानंद पहिला खेळाडू ठरला. जागतिक विजेत्या डी. गुकेशच्या विजेतेपदाच्या आशा मंगळवारी रात्री संपल्या. तो अलीरेझा फिरौझाविरुद्ध पराभूत झाला. प्रज्ञानंदचे १२ गुण असून, गुकेशच्या खात्यात आठच गुण आहेत. अमेरिकेचा वेस्ली सो १४ गुणांसह अव्वल आहे.
महिलांमध्ये बिबिसारा आसाबायेवाविरुद्ध पराभूत झाल्यामुळे दिव्या देशमुखच्या विजेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. बिबिसारा १५.५ गुणांसह आघाडीवर आहे. दिव्याचे दहा गुण आहेत. कोनेरू हम्पीला आर्मगेडन डावात ॲना मुझीचूकने पराभूत केले. हम्पीचे आव्हान संपले आहे.






