सात्त्विकचा खांदा दुखावला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सिंगापूर ओपन जिंकल्यानंतर दोनच दिवसांत सात्त्विकसाईराज रांकीरेड्डीच्या खांद्याला दुखापत झाली. यामुळे सात्त्विक-चिराग या भारतीय जोडीला इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. मलेशियाच्या जोडीविरुद्ध खेळताना सात्त्विकला दुखापत झाली. आयुष शेट्टीने मात्र पिछाडीनंतर विजय मिळवला. एच.एस. प्रणॉयला मात्र पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला.

सात्त्विकचा खांदा दुखावला

सिंगापूर ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर दोनच दिवसांत भारताची सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी-चिराग शेट्टी ही जोडी इंडोनेशिया ओपन सुपर-१००० बॅडमिंटन स्पर्धेसाठी सज्ज झाली. मात्र, पुरुष दुहेरीच्या सलामीच्या लढतीत सात्त्विकचा खांदा दुखावला. त्यामुळे भारतीय जोडीला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

सात्त्विक-चिरागची सलामीची लढत कांग खाई झिंग-अॅरॉन तॅई या मलेशियाच्या जोडीविरुद्ध होती. पहिल्या गेममध्ये भारतीय ६-११ असे मागे होते. त्या वेळी सात्त्विकने त्याच्या दुखावलेल्या उजव्या खांद्याकडे पंचांचे लक्ष वेधले. त्याने खेळणे अशक्य असल्याचे सांगितले आणि भारतीयांनी लढत सोडून दिली. जागतिक क्रमवारीत चौथे असलेल्या भारतीयांनी यंदा प्रथमच लढत सोडून दिली आहे. लागोपाठच्या स्पर्धामुळे अनेक खेळाडूंच्या शरीरावर ताण येत आहे. मात्र, सात्त्विक-चिरागसमोर ऑगस्टमधील जागतिक स्पर्धा; तसेच त्यानंतरच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरी महत्त्वाची असेल.

आयुषचा पिछाडीनंतर विजय

आयुष शेट्टीने पहिली गेम गमावल्यानंतरही चिवट लढा देऊन बाजी मारली. मात्र, एच. एस. प्रणॉयला पहिल्याच फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. आयुषने ६६ मिनिटांच्या लढतीत वेंग एच वाय याच्याविरुद्ध ८-२१, २२-२०, २१-१५ असा विजय मिळवला. एन. गुयेन याच्याविरुद्ध प्रणॉय १७-२१, २१-१६, १९-२१ असा पराभूत झाला.