सत्तर वर्षांपूर्वीची शाळा टप्प्याटप्प्याने होणार बंद

Contributed byप्राथमिक शिक्षणाधिकारी|महाराष्ट्र टाइम्स

छावणी परिसरातील जुनी रेजिमेंटल हायस्कूल २०२६-२७ पासून बंद होणार आहे. इमारतीची अवस्था धोकादायक असल्याने शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे इयत्ता पहिली व पाचवीमध्ये नवीन प्रवेश दिले जाणार नाहीत. सुमारे नऊशे विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. १९५४-५५ मध्ये सुरू झालेली ही शाळा आता इतिहासजमा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.

सत्तर वर्षांपूर्वीची शाळा टप्प्याटप्प्याने होणार बंद
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

शिक्षण विभागाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शाळा व्यवस्थापन समितीची बैठक ९ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये शाळेची इमारत ही विद्यार्थी व शालेय कर्मचारी यांच्यासाठी धोकादायक असल्याचे नमूद आहे. या बाबीचा विचार करता २०२६-२७ पासून इयत्ता पहिली व इयत्ता पाचवी वर्गात नवीन प्रवेश देण्यात येऊ नयेत असा ठराव संमत करण्यात आला आहे. इयत्ता दुसरी ते चौथी व इयत्ता सहावी ते दहावीमध्येदेखील नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये याबाबत ठराव घेण्यात आला आहे.

छावणी परिसरातील सत्तर वर्षांपूर्वीची रेजिमेंटल हायस्कूल २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे.

शाळेची इमारत विद्यार्थी, शालेय कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली व पाचवीच्या वर्गाचे प्रवेश थांबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून त्याअनुषंगाने कार्यवाही सुरू केली. सध्या शाळेत सुमारे नऊशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

शहरातील जुनी शाळा म्हणून छावणी परिसरातील रेजिमेंटल हायस्कूल ओळखली जाते. शाळेची स्थापना १९५४-५५ ची असून त्यावेळी सैनिकांच्या पाल्यांसाठी ही शाळा सुरू झाल्याचे सांगण्यात येते. शाळेसाठीची इमारत पूर्वीचीच असून ही इमारत शंभर वर्षापूर्वीची असल्याचेही सांगण्यात येते. शाळा स्थापनेनंतर कालांतराने शाळेचा विस्तार वाढत गेला. आज शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत नऊशे विद्यार्थी आहेत. शाळेची इमारत जुनी असल्याने विद्यार्थी, शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीने तसा निर्णय डिसेंबर २०२५ मध्ये घेतला होता, असे शिक्षण विभागाने म्हटले. यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शाळा बंद करण्याची कार्यवाही झाली. शाळा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. नवीन वर्षापासून हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पहिली व पाचवीला नवे प्रवेश दिले जाणार नाहीत.

शंभर वर्षांपूर्वीची इमारत

रेजिमेंटल हायस्कूल शाळा हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमात आहे. पहिली ते चौथी हिंदी माध्यमिक अनुदानित, तर इंग्रजी माध्यमाची पहिली ते सातवीपर्यंत अनुदानित शाळा आहे. यासह सेमी हिंदी, सेमी इंग्रजी माध्यमांच्याही तुकड्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरात हिंदी माध्यमाच्या अनुदानित शाळांची संख्या तीन, तर इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित शाळाही तीनच आहे. यामध्ये या शाळेचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.