शहरातील अमरीश चेस अकादमीतर्फे व जालना येथील ग्लोरियस चेस अकादमीच्या सहकार्याने 'एचटूई पॉवर सिस्टिम्स महाराष्ट्र राज्य निवड चाचणी ९ वर्षांखालील (खुली व मुलींची) बुद्धिबळ चॅम्पियनशिप उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्यातून २७० खेळाडूंनी नोंदणी करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
ही स्पर्धा शहरातील तिवारी मंगल कार्यालयात झाली. या स्पर्धेसाठी एकूण दहा हजार रुपयांचा बक्षीस निधी ठेवण्यात आला होता. ज्यात दोन्ही गटांतील विजेत्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये रोख व चषक व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटनाला परभणी जिल्हा संघटनेचा उपाध्यक्ष धनराज कांकरीया, वूमन कँडिडेट्स मास्टर अन्वी हिंगे, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती प्रतिका नंदी, मुख्य संयोजक अमरीश जोशी, मुख्य पंच आय. ए. प्रवीण ठाकरे आदींची उपस्थिती होती.
स्पर्धेच्या आठ फेऱ्या झाल्या. स्पर्धेत २७० खेळाडू सहभागी झाले होते, ज्यात ५५ आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित खेळाडूंचा समावेश होता. नऊ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडलेले खेळाडू असे : खुला गट: अनिश अभिजित जवळकर (पुणे), कथित निखिल शेलार (ठाणे). मुलींचा गट : अन्वी दीपक हिंगे (पुणे), अदीना मोहंती (पुणे), नंदी प्रितिका (पुणे), श्रेया अमोल शेळके (छत्रपती संभाजीनगर), इशी सिंग (मुंबई शहर), कनिष्का हिमांशू गाला (मुंबई उपनगर).






