छत्रपती संभाजीनगर : नाश्ता करण्यासाठी हातगाडीवर आलेल्या रिक्षाचालकाने पोह्यात मीठ जास्त झाले, अशी तक्रार करताच ह हॉटेल चालविणाऱ्या दोन भावांनी रिक्षाचालकाला मारहाण केली. ही घटना दोन जूनला पहाटे सिडको परिसरात घडली. मारहाण करणाऱ्यांची नावे अजय शिंगारे आणि जय मंगल शिंगारे अशी आहेत.
या प्रकरणात विजय प्रल्हाद चव्हाण (वय २३, रा. आनंदनगर, गारखेडा) यांनी तक्रार दिली. पोह्यात मीठ अधिक असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी हातगाडीचालकाकडे नाराजी व्यक्त केली. याच कारणावरून अजय शिंगारे याने संतापून हँडल असलेल्या तव्याने विजय चव्हाण यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर त्याचा भाऊ जय शिंगारे याने दगड डोक्यात व हातावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सहायक पोलिस निरीक्षक बहुरे तपास करीत आहेत.






