हरों से डरकर नैय्या पार नहीं होती, कोशिश करनेवालोंकी कभी हार नहीं होती’ या ओळी मनात रुंजी घालू लागल्या; जेव्हा मी संतोष नागो शिंदे यांचं ‘पट्यारा : एक संघर्षमय जीवनगाथा’ हे आत्मकथनात्मक पुस्तक वाचलं.
धुळ्यासारख्या शहरात लहानपणापासून दारिद्र्याचे चटके सहन कीरत असताना, शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा लेखकास अस्वस्थ करीत राहते. वडील मद्यपी, मोलमजुरी व काबाडकष्ट करून घरातलं चार-पाच जणांचं कुटुंब चालविणारी आई, कुणाची कसलीही मदत नाही... अशा परिस्थितीत केवळ आईच्या पाठिंब्यावर, सरकारी शाळेत प्रवेश घेऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लेखकाचं शालेय जीवन सुरू होतं. शिक्षणाची आवड व ओढ असल्यानं पहिली ते सातवीपर्यंत प्रत्येक वर्षी उत्तम गुण मिळवून ते पुढं जात राहतात. सकाळी पेपर टाकून, दुपारी शाळा शिकतात.
सातवीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून अनेक खटपटी करून आठवीपासून त्यांचा धुळे शहरातल्या नामांकित सिटी हायस्कूलमध्ये प्रवेश होतो. अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन नापास झाल्यानं शाळा सुटते की काय व पर्यायानं पुढील शिक्षणाचा मार्गही बंद होतो की काय अशी परिस्थिती निर्माण होते. शाळेतल्या कनवाळू शिक्षिका रेखा बारी यांच्या भावनिक आधारानं व प्रोत्साहनपर मार्गदर्शनानं संतोष यांचं भरकटलेलं जहाज पुन्हा योग्य दिशेनं वाटचाल करू लागतं. संस्कृत विषयाला घाबरणारा हा मुलगा पुढं आंतरशालेय संस्कृत मनोबोध परीक्षेत पहिला येतो. नाट्य स्पर्धांतही चमकदार कामगिरी करून साऱ्यांची मनं जिंकून घेतो.
एकीकडे शिक्षण चालू असताना घरावर आलेली संकटं, आईची कुतरओढ पाहून भांबावलेल्या संतोषची वाटचाल चालू असते. या मुळेच कधी बांधकामावर मजूर म्हणून काम कर, कधी हॉटेलमध्ये वेटर, तर कधी मिळेल ते छोटं मोठं काम करून घराला आर्थिक मदत करण्याचा मार्ग तो स्वीकारतो. कधी द्विधी मनस्थितीत, ‘हे पाय संतोस, आता उखळात डोकं टाकलंच हे ना, तर व्हऊ दे जे व्हईन ते’ हे आईचे बोल त्याला पुढं जाण्यासाठी मानसिक बळ व ऊर्जा देऊन जातात.
शालेय शिक्षणानंतर जीव तोडून प्रयत्न केल्यानंतर लेखकास महाविद्यालयात प्रवेश मिळातो. अत्यंत चिकाटीने रात्र पाळीत एका केमिकल फॅक्टरीत काम करून ते आपलं महाविद्यालयीन शिक्षण चालूच ठेवतात. महाविद्यालयीन शिक्षण संपताच आईच्या आग्रहाखातर विवाहबंधनात अडकतात. पुढं मित्र पंकज याच्या मदतीनं धुळे सोडून पुण्यास नोकरीच्या शोधात येतात. नोकरी मिळवण्यात यशस्वी होऊन नव्या शहरात स्थिरावतात. धुळ्यातल्या सरकारी शाळेपासून सुरू झालेला संतोष शिंदे यांचा प्रवास पुण्यापर्यंत पोहोचतो. आज ते पुण्यात एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा हा प्रवास ध्येयप्राप्तीचा अमूल्य बोध देणारा आहे. त्यांच्या या पुस्तकाला विविध पुरस्कारही मिळाले आहेत.






