जगण्यातल्या आनंदाचं मैत्र...

Contributed byचंद्रशेखर देशपांडे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागच्या १९७३ च्या बॅचमधील मित्रांची मैत्री आजही टिकून आहे. शिक्षणानंतर नोकरीनिमित्त वेगवेगळ्या शहरांत गेलेले मित्र पुन्हा एकत्र आले. त्यांनी एकत्र येऊन अनेक उपक्रम राबवले. शाळेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी शाळेला मदत केली. एकमेकांना समजून घेतल्याने त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली आहे.

the priceless bond of childhood friends this group keeps the thread of connection intact even after 50 years

‘न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग’ या शाळेतून सन १९७३ मध्ये अकरावी पास झालो. पुढं कॉलेज, मग रिझर्व्ह बँक मुंबई, नंतर नाबार्ड मुंबई, असा प्रवास सुरू झाला. रिझर्व्ह बँकेत असताना माझा एक शाळकरी मित्र प्रदीप काजळे हादेखील रिझर्व्ह बँकेत असल्याचं कळलं; पण कधी गाठ पडली नाही. सन १९८५ मध्ये ‘नाबार्ड’चं महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुण्यात सुरू झालं आणि मी पुण्यात आलो.

काही वर्षांत साधारण सन १९८७ मध्ये प्रदीप काजळे हादेखील पुण्यात आला व बालमैत्रीचा प्रवास पुढं सुरू झाला. पुढं आमचे शाळासोबती दिवंगत अनिल देशमुख, विकास सेटिया; जो आज एक प्रतिष्ठित उद्योगपती आहे, ‘एअर इंडिया’त चांगल्या पोस्टवर असणारा नरेंद्र प्रधान अशा पाच जणांचं छोटं वर्तुळ तयार झालं. कालांतरानं त्यात आमच्या पत्नी व मुलं यांचाही समावेश झाला. एकमेकांना वेळप्रसंगी मदत करणं, कौटुंबिक कार्यक्रम, एकमेकांच्या सुख-दुःखात साथ देणं, छोट्या सहली... असं आजतागायत सुरू आहे आणि राहील याची आम्हाला खात्री आहे.

शाळेत सोबत असलेल्या मित्रांची माहिती काढून त्याचा व्हॉट्सअप ग्रुप करावा, असा विचार मनी आला. आमच्या प्रयत्नांनी ग्रुप तयार झाला. प्रदीप व नरेंद्र हे दोघं त्या ग्रुपचे ॲडमिन आहेत. ग्रुपचं गेटटुगेदर, सहल असेही उपक्रम आम्ही करीत असतो. आमच्या बॅचचा सुवर्णमहोत्सव २०२३ मध्ये झाला. त्या निमित्तानं शाळेला देणगी, अन्य काही मदत, असाही उपक्रम राबविण्यात आला. हे सगळं करताना आम्ही चार जण सतत एकमेकांच्या संपर्कात असतो. एकमेकांना समजून घेतल्यामुळे वादविवाद होत नाहीत. अशीच आमची मैत्री अबाधित राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.