‘युवादिलां’ची कारने सहल

Contributed byराजू पवार|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

चार मित्रांनी कोलकात्याला एका लग्नासाठी कारने प्रवास केला. या १४ दिवसांच्या प्रवासात त्यांनी सेवाग्राम, पवनार, रामटेक, भेडाघाट, खजुराहो, पन्ना टायगर रिझर्व्ह, मैयर, गोविंदपूर, शांतिनिकेतन, दक्षिणेश्वर, बेलूर मठ, कालीघाट, व्हिक्टोरिया मेमोरियल, कोणार्क सूर्यमंदिर, जगन्नाथ मंदिर, विशाखापट्टणम, चारमिनार, गाणगापूर आणि अक्कलकोट यांसारख्या ठिकाणांना भेटी दिल्या. हा प्रवास मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधून झाला.

youths adventurous journey experience

म्ही चार मित्र नाश्त्यासाठी एकत्र आलो होतो. त्या वेळी हेमंत धावड म्हणाला, ‘माझ्या मित्राच्या मुलाचं लग्न कोलकात्याला आहे. आपण ट्रिप व लग्न दोन्ही करायचं का?’ सगळ्यांनी पटकन होकार दिला आणि माझ्या कारनं जाण्याचा निर्णय झाला. वयाच्या साठीनंतर कोणतंही नियोजन न करता या सहलीचा निर्णय घेतला. मार्ग ठरला असला, तरी संध्याकाळ होईल तिथं मुक्काम, असं ठरवलं होतं. लग्न २४ जानेवारी रोजी होतं. एकूण अंतर, जाताना पाहायची ठिकाणं आणि एक दिवस जास्तीचा असं धरून आम्ही प्रवासाला सुरुवात केली.

प्रथम वर्ध्याला सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. बापूंची कुटी पाहून, त्या काळातील साधी राहणी आणि उच्च विचारांची प्रचिती आली. त्यानंतर विनोबा भावे यांच्या पवनार आश्रमाला भेट दिली. तिथल्या स्वयंसेविकेनं आश्रमाबद्दल माहिती दिली. नागपूरला रात्रीच्या मुक्कामाला गेलो. दिवसभर प्रवास करून सगळे दमले होते; त्यामुळे सकाळी उशिरा निघालो. प्रथम रामटेकच्या राम मंदिरात गेलो. टेकडीवर असलेल्या या मंदिरातून दिसणारा सभोवतालचा निसर्ग अतिशय विलोभनीय होता. रामटेकनंतर जबलपूरमध्ये भेडाघाटला आम्ही रोप-वेचा आनंद घेतला. उंचावरून दिसणारं नर्मदा नदीचं पात्र आणि पांढरेशुभ्र संगमरवरी खडक पाहून निसर्गाच्या किमयेचं कौतुक वाटलं. मुक्कामासाठी खजुराहोला पोहोचलो. खजुराहोची मंदिरं ही मानवी कल्पनाशक्तीच्या पलीकडची शिल्पकला आहे. गाइडच्या मदतीनं तिथला इतिहास समजून घेताना आम्ही मंत्रमुग्ध झालो. त्यानंतर पुढं पन्नाला मुक्काम केला. सकाळी लवकर उठून सफारीसाठी पन्ना टायगर रिझर्व्हमध्ये गेलो. नशिबानं साथ दिली आणि अवघ्या २५ फुटांवर वाघ दिसला. त्यानंतर तिथली लेणी पाहिली. आम्ही मैयरला देवीचं दर्शन घेतले. रोप-वेची सोय असल्यानं वेळ व श्रम दोन्ही वाचले. रात्री मुक्कामास रिवा इथं गेलो.

रिवा ते कोलकाता अंतर बरंच असल्यानं धनबादजवळील गोविंदपूर इथं मुक्काम केला. तिथून सकाळी लवकर निघालो. प्रथम शांतिनिकेतनला भेट दिली. गाइड करून सगळी ठिकाणं पाहिली. त्यानंतर दक्षिणेश्वर मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेतलं. रामकृष्ण परमहंस यांचं राहण्याचं ठिकाण पाहिलं. संध्याकाळी दक्षिणेश्वर ते बेलूर मठ हा प्रवास फेरी बोटीनं केला. रात्री मुक्कामास कोलकात्याला पोहोचलो. प्रवासाचा एक टप्पा पार पडला होता.

एक दिवस कालीघाट इथं कालिमाता मंदिरात देवीचं दर्शन घेतलं. बिर्ला प्लॅनेटोरियम आणि इंडियन म्युझियम पाहिलं. संग्रहालय खूपच मोठं आहे. दुसऱ्या दिवशी व्हिक्टोरिया मेमोरियल, सायन्स सिटी पाहिलं. इको पार्कमध्ये जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती आहेत. त्या पाहून आश्चर्य वाटलं. संध्याकाळी बंगाली पद्धतीचं लग्न अनुभवायला मिळालं. त्यात चार तास कसे निघून गेले, ते समजलं नाही. लग्नानंतर परतीच्या प्रवासासाठी निघालो. प्रथम रणचंडी देवीचं दर्शन घेतलं. भुवनेश्वरला लिंगराज मंदिरात दर्शन घेतलं. मंदिराचं बांधकाम सुंदर आहे. त्यानंतर धौली इथला शांती स्तूप पाहिला आणि भुवनेश्वरला मुक्काम केला. सकाळी लवकर उठून पुरीची वाट पकडली. जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी पाच तास लागले. तिथला ध्वज बदलण्याचा सोहळा पाहून सर्व थकवा निघून गेला. मुक्कामासाठी कोणार्कला गेलो. कोणार्कचं सूर्यमंदिर आणि तिथला ‘लाइट शो’ थक्क करणारा होता. आम्हाला छोट्या रस्त्यानं विशाखापट्टणमला जावं लागलं. अंधार पडायला लागला होता. रस्त्यात येणाऱ्या गावांत खूप गर्दी असायची. सहा किलोमीटर अंतराला तास लागला. थांबायला ठिकाण दिसेना, तेवढ्यात महामार्ग लागला आणि जीव भांड्यात पडला.

विशाखापट्टणममध्ये आम्ही संरक्षण दलांच्या संग्रहालयांना भेट दिली. सकाळी पिठापूर इथं दर्शन घेतलं आणि हैदराबादला पोहोचलो. हैदराबादमध्ये रात्रीच्या वेळी चारमिनारचं सौंदर्य डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. तिथल्या प्रसिद्ध हॉटेल शादाबमधील जेवणाची चव अप्रतिम होती. सकाळी लवकर उठून गाणगापूरला निघालो. इथं गंमत झाली. गुगल मॅप लावला होता. इंटरनेटचा स्पीड कमी होता. समोर दोन रस्ते होते. दोन रस्त्यांमध्ये ३० फुटांचं अंतर होते. नेटचा स्पीड कमी असल्यानं अलीकडच्या रस्त्यावर वळलो. जसजसे पुढं जात होतो, तसतसा रस्ता छोटा होत गेला. नंतर एकदम मोठमोठे दगड असलेल्या रस्त्यावर घेऊन गेला. आम्ही परत फिरलो व दुसऱ्या रस्त्यानं गाणगापूरला पोहोचलो. दर्शन घेऊन अक्कलकोटला पोहोचलो. स्वामींचं दर्शन घेऊन हेमंतच्या गावी सोलापूरला गेलो. तिथं मुक्काम केला. त्यानं पाहुणचार चांगला केला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुण्याला पोहोचलो.

आम्ही हा १४ दिवसांचा प्रवास मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा, तेलंगण, आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांमधून सुखरूप पूर्ण केला.