बाह्य सौंदर्यासाठी आपण वेळ घालवतो, पण आंतरिक सौंदर्यावर काय करत नाही. मन चांगले ठेवण्यासाठी काम करायलाही हवे. आता तर प्रत्येकच साध्या गोष्टीला दिखाऊपणा जोडला गेला. लग्नाचा बडेजाव न करता अनावश्यक खर्च टाळा, असे आवाहन अमृताश्रम महाराज स्वामी महाराज यांनी केले.
श्री अमळनेरकर महाराज सेवा संघाच्या वतीने शहरातील सिडको एन-७ येथील रामलीला मैदानावर अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या वेळी अमृताश्रम महाराज स्वामी महाराज (बीड) यांनी संगीतमय श्री संत एकनाथ महाराज जीवन दर्शन कथा सांगत होते. हा सोहळा खुद्द सद् गुरू प्रसाद अमळनेरकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यामुळे कार्यक्रमाला राज्यभरातूनच भाविक आले आहेत.
अधिक मासानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अध्यात्म व सेवेचा परिसस्पर्श बघायला मिळाला. अखिल विश्वाचे कल्याण व शांततेसाठी परमेश्वराकडे केलेल्या पसायदान स्वतः समजून घेत हजारो भाविक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
ज्ञानेश्वर माऊलींच्या
चलत सृष्टीचेनि मेळें ।
जो जेथील आळें ।
तो तैसाचि अवलोळें । संतसंगें ।
या ओळींप्रमाणेच प्रसाद महाराज अमळनेरकर व इतरही संतांच्या दर्शनासाठी भाविक येत आहेत. सहा जूनपासून हा चैतन्य सोहळा सुरू असून या अखंड हरिनाम सप्ताहात सकाळी ७ ते ११ या वेळेत हे सामूहिक पारायण चालते. संगीतमय श्री संत एकनाथ महाराज जीवन गाथा व भजन, हरिपाठ कार्यक्रम चालतात. पारायणादरम्यान चातुर्मास्ये महाराज आणि कृष्णा आरगडे महाराज यांच्या उंची स्वरात ज्ञानेश्वरी ऐकायला मिळते. या पारायण सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे १२ जून रोजी सायंकाळी सहा वाजता दीपोत्सव होईल. १३ जूनला सकाळी आठ ते दहा या वेळेत दिंडी सोहळा (नगरप्रदक्षिणा) काढण्यात येणार आहे.






