बालकामगाराची बोटे मशीनमध्ये तुटली

महाराष्ट्र टाइम्स

नालासोपारा पूर्वेतील पेल्हार परिसरात एका कंपनीत धक्कादायक घटना घडली. एस.एच. होम कंपनीत काम करणाऱ्या १३ वर्षीय बालकामगाराचा पॅकिंग मशीनमध्ये हात अडकून चार बोटे तुटली. या गंभीर अपघातानंतर मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बालकामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनी मालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

tragic accident of child laborer in nalasopara

नालासोपारा पूर्वेतील पेल्हार परिसरात एका कंपनीत काम करणाऱ्या १३ वर्षीय बालकामगाराचा पॅकिंग मशीनमध्ये हात अडकल्याने गंभीर अपघात झाला. या घटनेत मुलाच्या हाताची चार बोटे तुटल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कंपनी मालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलगा पेल्हार येथील ‘एस.एच. होम’ कंपनीत काम करत होता. २ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास तो कंपनीतील पॅकिंग मशीनवर काम करत असताना त्याचा हात मशीनमध्ये अडकला. या अपघातात त्याच्या हाताची चार बोटे गंभीर जखमी होऊन तुटली.

अपघातानंतर जखमी मुलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

देशातील प्रचलित कायद्यांनुसार अल्पवयीन मुलांकडून विशिष्ट प्रकारची कामे करून घेण्यावर निर्बंध आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीत १३ वर्षीय मुलगा काम करत असल्याचे समोर आल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन मुलाला धोकादायक यंत्रावर काम दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिस हवालदार दीपक अंबादास शेळके यांच्या तक्रारीवरून पेल्हार पोलिस ठाण्यात कंपनी मालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.