खुलताबाद : जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे यांचा मृत्यू, वाळू माफियांच्या टोळीने केलेल्या बेदम मारहाणीत झाल्याचा आरोप बोरसे कुटुंबीयांनी केला आहे. दोषींना अटक करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी वेरूळमध्ये रास्तारोको करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बोरसे यांची शवचिकित्सा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात करण्यात आली. याप्रकरणी जोपर्यंत दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. मृतदेह असलेली रुग्णवाहिका रस्त्यावर उभी करून वेरूळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे, तालुकाप्रमुख राजू वरकड सहभागी झाले.
घटनेची चौकशी सुरू असून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सांगितले.






