मृत जफर पटेल हे अबरार कॉलनी येथे राहत होते. त्यांचा मुलगा अब्दुल रहेमान हा शिक्षित असून तो परिवारासह सिल्कमिल कॉलनीत राहत होता. या सिल्कमिल कॉलनी परिसरातील मालमत्तेवरून बाप लेकामध्ये वाद सुरू होते. आठ ते दहा महिन्यांपासून हे वाद सुरू होते. अब्दुल रहेमान याला परिसरात डॉक्टर म्हणून ओळखत होते. तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करीत होता, अशी प्राथमिक माहिती सातारा पोलिसांनी दिली.
सिल्क मिल परिसरात मालमत्तेच्या वादातून मुलाने वडिलांवर धारदार हत्याराने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी (११ जून) सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. या घटनेत बापावर हल्ला केल्यानंतर मुलाने त्याच्या बहिणीवरही धारदार हत्याराने वार करून जखमी केले.
मृताचे नाव सय्यद जफर करीमोद्दीन पटेल (वय ८४, रा. अबरार कॉलनी) असे आहे. मारेकऱ्याचे नाव अब्दुल रहेमान जफर पटेल (वय ४५, रा. सिल्कमिल कॉलनी) असे असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.
या प्रकरणी सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्क मिल कॉलनी परिसरात सय्यद जफर पटेल यांचे आणि त्यांचा मुलगा अब्दुल रहेमान या दोघांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू होता. हा वाद न्यायालयात गेला. न्यायालयाने जफर पटेल यांच्या बाजूने निकाल दिला. वादग्रस्त जागेवर गुरुवारी सय्यद जफर पटेल व त्यांची मुलगी तसेच अन्य काही जण हे आले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार जफर पटेल यांनी मालमत्तेचा ताबाही घेतला. मालमत्ता ताब्यात घेऊन जफर पटेल हे मुलीसोबत रिक्षातून त्यांच्या घराकडे जात होते. अब्दुल रहेमान याने रिक्षापुढे दुचाकी आणून उभी केली.
जफर पटेल यांचे वाहन अडविताच, रहेमान याने बापावर चाकूने सपासप वार केले. बापाला वाचविण्यासाठी तिची बहिण आली असता, तिच्यावरही अब्दुल रहेमान याने वार करून जखमी केले.
बापासह बहिणीवर हल्ला करून अब्दुल रहेमान हा पळून गेला.
दरम्यान, आसपासच्या नागरिकांनी जखमी जफर पटेल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी जफर पटेल यांना तपासून मृत घोषित केले, तसेच जफर पटेल यांच्या मुलीवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे यांच्यासह पोलिस अंमलदार महेश गोले, दिगंबर राठोड, सुनील बेलकर यांनी धाव घेतली. मारेकरी अब्दुल रहेमान याला नातेवाइकांकडून ताब्यात घेतले. या प्रकरणात उशिरापर्यंत सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे. वाद नेमका कशामुळे झाला याची माहिती घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.






