खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असले तरी असमतल रस्त्यांचा प्रश्न कायम असल्याची नागरिकांची तक्रार आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक ठिकाणी खड्डे बुजवताना केवळ डांबराचा तात्पुरता मुलामा देण्यात आला; मात्र रस्ते समतल करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दहिसरमधील आनंदनगर, किंग्ज सर्कल परिसर तसेच, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील अनेक ठिकाणी रस्ते उंच-सखल झाल्याने प्रवास खडतर झाला आहे. सततच्या धक्क्यांमुळे कंबरदुखी आणि पाठदुखीच्या तक्रारी वाढत असल्याचे वाहनचालक सांगतात. या समस्येकडे लक्ष वेधत उपमहापौर संजय घाडी यांनी मार्च महिन्यात महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले होते. मात्र अद्याप या प्रश्नावर ठोस उपाययोजना झालेली नाही.







