‘महोगाथा’ला सात पुरस्कार

महाराष्ट्र टाइम्स

'महोगाथा' या प्रायोगिक नाटकाने 'नटश्रेष्ठ शरद तळवलकर स्मृती करंडक २०२६' स्पर्धेत सात पुरस्कार पटकावले. महाश्वेतादेवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सादर झालेल्या या नाटकाला सांघिक तृतीय क्रमांक आणि सहा वैयक्तिक पुरस्कार मिळाले. हृदयनाथ जाधव, सावित्री मेधातुल, मंगेश सातपुते, विलास हुमणे आणि विक्रम होता यांना गौरविण्यात आले. कलाकारांच्या मेहनतीचा हा विजय असल्याचे टीमने म्हटले आहे.

‘महोगाथा’ला सात पुरस्कार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

प्रायोगिक रंगभूमीवर सध्या गाजत असलेल्या ‘महोगाथा’ या नाटकाने ‘ नटश्रेष्ठ शरद तळवलकर स्मृती करंडक २०२६’ या स्पर्धेत एकूण सात पुरस्कारांवर मोहोर उमटविली आहे. प्रख्यात लेखिका महाश्वेतादेवी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ‘काली बिल्ली प्रॉडक्शन’ने हे नाटक रंगभूमीवर आणले आहे. या स्पर्धेत या नाटकाला एक सांघिक आणि सहा वैयक्तिक; असे एकूण सात मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘विजय पटवर्धन फाऊंडेशन’ या संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

‘महोगाथा’ नाटकाने या स्पर्धेत सांघिक तृतीय क्रमांक पटकावला असून, ‘ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन, पुणे’ पुरस्कृत ‘अतुल परचुरे स्मृती करंडक’ या नाटकाला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष) - तृतीय: हृदयनाथ जाधव, सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री) - तृतीय: सावित्री मेधातुल, विशेष लक्षवेधी लेखन (स्त्री): सावित्री मेधातुल, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - तृतीय: मंगेश सातपुते, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना - द्वितीय: विलास हुमणे आणि सर्वोत्कृष्ट संगीत - तृतीय: विक्रम होता यांना या नाटकासाठी पारितोषिके मिळाली आहेत. ‘रंगमंचावर घाम गाळणाऱ्या कलाकारांपासून ते पडद्यामागे अहोरात्र राबणाऱ्या आमच्या तांत्रिक टीमपर्यंत प्रत्येकाच्या प्रामाणिक प्रयत्नांचा हा विजय आहे,’ अशा भावना हे पुरस्कार जिंकल्यावर या नाटकाच्या टीमने व्यक्त केल्या आहेत.