मुंबई : सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये मागील अनेक महिन्यांपासून शवागाराचे काम अर्धवट स्थितीमध्ये होते. सर्वसामान्य आणि लोकप्रतिनिधींच्या संयुक्त प्रयत्नांमधून या रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्राचे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे. आता तिथे २४ मृतदेह ठेवण्याच्या क्षमतेसह शीतगृह व्यवस्था, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी व्ह्यूइंग गॅलरी आणि सुधारित पायाभूत सुविधांनीयुक्त अशा नव्या केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
‘डिग्निटी इन डेथ फाऊंडेशन’च्या संस्थापक रेणू कपूर यांनीही या शवागाराचे काम पूर्ण व्हावे, यासाठी पाठपुरावा केला. रेणू या त्यांच्या वाहनचालकाचा शवविच्छेदन अहवाल घेण्यासाठी रुग्णालयातील शवागारामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी तेथील दुरवस्था पाहून त्या अस्वस्थ झाल्या. ही परिस्थिती बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कुलाबा येथील ३४ सर्वसामान्यांना एकत्र आणून स्वच्छ, सुसज्ज असे शवविच्छेदन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले.







